Sangli Samachar

The Janshakti News

पहिलीतील मुलीशी गैरवर्तन करणाऱ्या शिक्षकाला अटक



सांगली समाचार  - दि. २० मार्च २०२४
सांगली - पहिलीमध्ये शिक्षण घेणार्‍या मुलीशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न करणार्‍या एका खासगी शिक्षण संस्थेतील शिक्षकाला मंगळवारी अटक करण्यात आली. संस्थेनेही या शिक्षकावर बडतर्फीची कारवाई केली असून अशा समाज विघातक प्रकारांना संस्था कदापि पाठीशी घालणार नसल्याचा निर्वाळा संस्थेच्यावतीने देण्यात आला. 

याबाबत मिळालेली माहिती अशी विश्रामबागमध्ये असलेल्या महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या खासगी शाळेमध्ये पहिलीच्या वर्गात शिक्षण घेणार्‍या पिडीतेशी शिक्षक संदीप पवार याने गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पीडितेने पालकांना सांगताच पालकांनी याबाबत संस्थेचे सचिव सुरेंद्र चौगुले यांच्याकडे तक्रार केली. संस्थेनेही त्यांना तात्काळ बडतर्फ केले.


दरम्यान, पीडितेच्या आईने याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली असून पोलीसांनी शिक्षकाला अटक केली आहे. या प्रकरणी दाखल गुन्ह्याच्या तपासात संस्थेने सहकार्य करण्याचे मान्य करत हा प्रकार घडत असताना चित्रित झालेले चित्रीकरण तपासकामी देण्यात येईल असे सचिव चौगुले यांनी सांगितले. शिक्षण क्षेत्रात असे प्रकार संस्था कदापि खपवून घेणार नाही, संबंधित शिक्षकावर पालकांच्या तक्रारीनंतर तात्काळ बडतर्फीची कारवाई करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.