सांगली समाचार - दि. २६ मार्च २०२४
मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला सुरुंग लावल्यानंतर 13 खासदारांनी त्यांना पाठिंबा दिला होता. आता त्याच 13 खासदारांना पुन्हा एकदा खासदारकीचे तिकीट मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेतली असली, तरी त्यामध्ये किती जणांचा पत्ता कट केला जाणार आणि किती जणांना पुन्हा एकदा तिकीट मिळणार ? याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे. महायुतीमध्ये जागावाटपाचा तिढा सुटला नसतानाच तसेच मनसेच्या संभाव्य समावेशावर चर्चा सुरूच असतानाच एका जागेवर तिढा सुटल्याचे बोलले जात आहे.
कृपाल तृमानेंचा पत्ता कट झाल्यात जमा
रामटेक लोकसभा (Ramtek Loksabha) मतदारसंघामधून सध्या शिवसेना शिंदे गटाचे कृपाल तृमाने खासदार आहेत. मात्र, आता यांचा पत्ता कट झाल्यात जमा आहे. काँग्रेस आमदार राजू पारवे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याने कृपाल तुमाने यांचा पत्ता जवळपास कट झाल्यात जमा आहे. गेल्या काही दिवसांपासून महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा कमालीचा गुंतागुंतीचा झाला असून गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चांवर चर्चा होत असताना कोणता मतदारसंघ कोणाच्या वाटेला जाणार याबाबत अजूनही खल सुरूच आहेत. भाजपकडून 23 उमेदवार जाहीर करण्यात आले असले, तरी शिंदे गटाकडून आणि अजित पवार गटाकडून कोणत्याही उमेदवारावर अजून शिकामोर्तब करण्यात आलेलं नाही.
या सर्व पार्श्वभूमीवर आता राजू पारवे यांच्या शिंदे गटातील प्रवेशाने एक प्रकारे त्यांच्या रामटेकच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याचे बोलले जात आहे. या जागेवरून भाजप आणि शिंदे आमनेसामने आले होते. एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा करून ही जागा आपल्या पदरात पाडून घेतली आहे. त्यानंतर राजू पारवे यांचा शिंदे गटात प्रवेश झाला आहे. अशा स्थितीत आता ही जागा शिंदे गट लढणार जवळपास निश्चित आहे. रामटेक मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असून कृपाल तुमाने खासदार आहेत.
4 खासदारांवर उमेदवारीची टांगती तलवार
दुसरीकडे शिंदे गटातील किमान 4 खासदारांवर उमेदवारीची टांगती तलवार आहे. उमेदवारी मिळणार की नाही? यासाठी अजूनही त्यांची घालमेल सुरूच आहे. यामध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ, हातकणंगले लोकसभा मतदारसंघ, यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघांमधील शिंदे गटाच्या खासदारांना तिकीट मिळणार की नाही? याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष आहे. या जागांवर भाजपकडून दावा करण्यात आला आहे. भाजपकडून पडद्यामागून चाचणी सुरू असल्याने या ठिकाणी या विद्यमान खासदारांना तिकीट मिळेल की नाही अशी स्थिती आहे. कोल्हापुरातून संजय मंडलिक सातत्याने प्रयत्न करत असले, तरी अजूनही कोणताही हिरवा कंदील मिळालेला नाही. हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने आणि वाशिमच्या खासदार भावना गवळी यांच्या मतदारसंघावरही भाजपकडून दावा करण्यात आला आहे.
नाशिक लोकसभेवरून महायुतीमध्ये कलगीतुरा
दुसरीकडे, नाशिक लोकसभेवरून महायुतीमध्ये कलगीतुरा रंगला आहे. याठिकाणी शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे असले तरी त्यांची सुद्धा उमेदवारी निश्चित नसल्याचे बोलले जात आहे. या जागेवर सुद्धा भाजपकडून दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांनी उमेदवारी जाहीर करूनही भाजपने त्याठिकाणी कडाडून विरोध केला आहे. हेमंत गोडसे यांनी थेट ठाण्याला धडक देत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. त्यामुळे त्यांना सुद्धा उमेदवारी मिळणार की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.
सातारच्या जागेवरून महायुतीमध्ये तिढा
शिंदे गटातील ही स्थिती असताना अजित पवार गटातील स्थिती सुद्धा वेगळी नाही. सातारच्या जागेवरून महायुतीमध्ये अजित पवार गट आणि भाजप आमने सामने आले आहेत. याठिकाणी उदयनराजे भोसले यांनी उमेदवारीसाठी गेल्या चार दिवसांपासून दिल्लीत तळ ठोकळा असला तरी त्यांच्या उमेदवारीवर अजूनही शिक्कामार्फत झालेली नाही. उदयनराजे यांनी उमेदवारी फिक्स असली तरी ते कोणत्या चिन्हावर असतील याबाबत मात्र अजूनही स्पष्टता आलेली नाही.
याठिकाणी उदयनराजे भाजपच्या चिन्हावर इच्छुक असले, तरी दुसरीकडे अजित पवार उदयनराजे यांना तिकीट देण्यासाठी तयार असले तरी त्यांना घड्याळ चिन्हाची अट ठेवली आहे. त्यामुळे सातारमध्ये कोणता निर्णय घेतला जाणार हे सुद्धा महत्त्वाचं आहे. शिरूर मतदारसंघांमध्ये अदलाबदल झाली असून आज (26 मार्च) शिवाजीराव आढळराव पाटील हे अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याने शिरुरमधील उमेदवारी निश्चित मानली जात आहे.
दुसरीकडे मावळमध्ये सुद्धा बारणे यांची उमेदवारी आजघडीला निश्चित मानण्यात येत असली, तरी चिन्ह कोणते असेल याबाबत अजूनही मात्र स्पष्टता आलेली नाही. त्यामुळे भाजपने एक प्रकारे 23 जागांवर उमेदवार घोषित करून चित्र स्पष्ट केला असले तरी उर्वरित जागांवरती मात्र अजूनही खल सुरूच आहे. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून 80 टक्के जागांवर बोलणी झाली आहे असं सांगण्यात येत असलं तरी पवार आणि शिंदे गटातील उमेदवार घोषित का होत नाहीत? याकडे सुद्धा राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे. रत्नागिरीसिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे. याठिकाणी नारायण राणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याची माहिती देण्यात आली असली, तरी मात्र त्याची स्पष्टता आलेली नाही.

