Sangli Samachar

The Janshakti News

'इंजिना'ने हाती धरावा 'धनुष्यबाण'; शिंदे-फडणवीसांचा राज यांना प्रस्तावसांगली समाचार - दि. २३ मार्च २०२४
मुंबई - महाराष्ट्रात महायुतीत नव्या भिडूची भर पडणार हे जवळपास निश्चित झाले असतानाच लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेनेच्या 'धनुष्यबाण' या परंपरागत निवडणूक चिन्हावर लढावे, असा प्रस्ताव समोर ठेवण्यात आला आहे. मनसेच्या महायुतीत समावेशासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज ठाकरे यांच्याबरोबर सुमारे दीड तास चर्चा केली. 'कमळ', 'धनुष्यबाण' आणि 'घड्याळ' या तीन चिन्हांत ऐनवेळी 'इंजिना'ची भर पाडण्याऐवजी यावेळी मनसेने 'धनुष्यबाण' हाती घेणे फायद्याचे ठरेल काय, यावर चर्चा झाल्याचे समजते.

मनसेने महायुतीत येणे हे मराठी मते खेचण्यासाठी महत्त्वाचे आहे, तसेच उद्धव ठाकरे महाराष्ट्रभर प्रचारासाठी फिरत असले तरी 'ब्रँड ठाकरे' आमच्याकडेही आहे, हे राज यांच्या समावेशामुळे भाजपसाठी महत्त्वाचे मानले जाते आहे. आज तिन्ही नेत्यांनी महाराष्ट्रातील 'मविआ'च्या जागांवरील परिस्थितीचा आढावा घेतला. लोकसभा, विधानसभा आणि महापालिकांत तिघांनी एकत्र राहणे फायद्याचे ठरणार आहे. मनसेला केवळ लोकसभाच नव्हे, तर पाठोपाठ येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही वाटा हवा आहे.


अदलाबदल शक्य

शिंदे, फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यातील चर्चेमध्ये मतदारसंघांची अदलाबदल करण्याबाबतही चाचपणी करण्यात आली. शिर्डीत शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले सदाशिव लोखंडे सध्या एकनाथ शिंदेसमवेत आहेत. त्यांनी एक विधानसभा निवडणूक मनसेतर्फेही लढवली होती.

मनसेच्या बाळा नांदगावकरांना तेथून रिंगणात उतरवावे की दक्षिण मुंबईत भाजपने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना रिंगणात न उतरवता नांदगावकरांना धनुष्यबाणावर लढवावे, यावर विचार झाला. नाशिक येथेही शिवसेनेऐवजी भाजपने लढावे असा प्रस्ताव आहे. ती जागा मनसेला देण्यावरही विचार झाला असावा, असे समजते.

दरम्यान, तिन्ही नेत्यांनी बैठकीतला कोणताही तपशील अद्याप जाहीर केलेला नाही. मनसेने बहरात असताना मुंबईत घेतलेल्या मतांचा आढावाही घेण्यात आला. मनसेने त्यावेळी प्रत्येक लोकसभा मतदारसंघात लाखाहून अधिक मते घेतली होती. बैठकीतल्या चर्चेनंतर राज ठाकरे सहकाऱ्यांशी सल्लामसलत करणार होते. एक ते दोन दिवसांत या नेत्यांची पुन्हा बैठक होण्याची शक्यता आहे.

शिंदे जागा देण्यास तयार?

विद्यमान खासदारांबद्दलच्या नाराजीमुळे जिंकण्याची शक्यता कमी असल्याच्या भाजपच्या सूचनांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विचार केल्याचे सांगण्यात येते. परिस्थिती लक्षात घेत ते काही मतदारसंघात चेहरे बदलण्यास तयार असल्याचे समजते. दरम्यान, कोण किती जागा जिंकणार, यापेक्षाही ४५ पेक्षा जास्त जागा जिंकणे महत्त्वाचे आहे हे लक्षात घेत शिंदे यांनी त्यांना हव्या असलेल्या १३ लोकसभा जागांची यादी भाजप श्रेष्ठींना पाठवल्याचे बोलले जाते.