Sangli Samachar

The Janshakti News

विष्णुआण्णा खरेदी-विक्री संघावर पुन्हा 'पाटीलकी'सांगली समाचार - दि. ६ मार्च २०२४
सांगली - विष्णुआण्णा सहकारी खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांच्या सत्ताधारी वसंतदादा विकास पॅनेलने पुन्हा वर्चस्व मिळवले. सहकारी संस्था प्रतिनिधी गटातील सहा जागांसाठी निवडणूक पार पडली. त्यामध्ये शून्य विरुद्ध 25 मते मिळवत सत्ताधारी पॅनेलच्या सहाही उमेदवारांनी एकतर्फी विजय मिळवला. दरम्यान, अकरा उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आले होते.  विष्णुआण्णा सहकारी खरेदी-विक्री संघाची पंचवार्षिक निवडणूक पार पडली. संघाच्या स्थापनेपासून या संस्थेवर स्व. विष्णुआण्णा, माजी मंत्री स्व. मदनभाऊ पाटील यांचे वर्चस्व होते. मदनभाऊ यांच्यानंतर संघाची धुरा काँग्रेस नेत्या व जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांनी सांभाळली. बिनविरोधाची परंपरा असलेल्या या संस्थेत यंदा पहिल्यांदाच एका गटात निवडणूक झाली. जयश्री पाटील यांच्यासह अकरा उमेदवार बिनविरोध झाले होते, परंतु सहकारी संस्था गटात सहा जागांसाठी सात उमेदवारांचे अर्ज राहिल्याने त्यासाठी सोमवारी मतदान पार पडले. मतदानानंतर लगेचच मतमोजणी झाली.


संस्था गटात केवळ 26 मतदार होते. यातील 25 जणांनी मतदान केले. शंभर टक्के मते मिळवत शून्य विरुद्ध 25 मतांनी सत्ताधारी पॅनेलचे सर्व सहाही उमेदवार विजयी झाले. विरोधी उमेदवारास शून्य मते मिळाली. निकालानंतर सत्ताधारी पॅनेलच्या उमेदवारांनी फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करत जल्लोष केला. तसेच वसंतदादा, मदनभाऊ व विष्णुआण्णांच्या समाधीस अभिवादन केले.

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष संग्राम पाटील यांच्या नेतृत्वात संघाने प्रगती केली आहे. त्यामुळे जयश्रीताई पाटील यांनी निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपवली होती. त्यांनी 11 जागा बिनविरोध निवडून आणल्या. उर्वरित जागांच्या बिनविरोधसाठी शेवटपर्यंत प्रयत्न झाले. पण विरोधकांनी जाणीवपूर्वक केवळ एकच उमेदवार देत निवडणूक लादली. याला संग्राम पाटील यांनी सडेतोड उत्तर देत शंभर टक्के मते मिळवत सर्व सहाही जागांवर एकतर्फी विजय मिळवत किंगमेकर ठरले.

निवडणुकीत विजयी उमेदवार -

संग्राम पाटील, उदय पाटील, राहुल काशीद, चंद्रशेखर शेटे, सचिन वाडकर, सर्जेराव पाटील (प्रत्येकी 25 मते), पराभूत उमेदवार - बाळासो पाटील (शून्य मते) 

बिनविरोध झालेले उमेदवार - 

जयश्रीताई पाटील, सुजाता पाटील, अशोक पाटील, रमेश चौगुले, सुहास पाटील, उत्तम पाटील, शमांकांत आवटी, भीमराव मिसाळ, शीतल लोंढे, अनिल भोरे, संजय गवळी.