Sangli Samachar

The Janshakti News

मंदिराला पुढचे पाचशे वर्षे काही होणार नाही; श्री विठ्ठल मंदिर संवर्धनाचे काम प्रगतीपथावर



सांगली समाचार - दि. २४ मार्च २०२४
पंढरपूर - ढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे संवर्धन व सुशोभीकरण करताना बेसाल्ट दगड व चुन्याचा वापर केला जात असून या दगडाचे आयुर्मान अनेक शतके असते. त्यामुळे किमान पाचशे वर्षे मंदिराचे मजबुतीकरण होणार असल्याचा दावा पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक विलास वाहने यांनी केला आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सुरू असलेल्या विविध कामांचा आढावा घेण्यासाठी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांसह ठेकेदार व मंदिर समिती सदस्य यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंदिर समितीची सहअध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, डॉ. दिनेशकुमार कदम, सदस्या शकुंतला नडगिरे, माधवी निगडे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, वास्तुविशारद तेजस्विनी आफळे, ठेकेदार रमेश येवले, बांधकाम विभाग प्रमुख बलभिम पावले यांच्यासह इतर सदस्य ऑनलाईन उपस्थित होते.

संपूर्ण मंदिराचे काम कधी पूर्ण होणार?

यावेळी विकास वाहने यांनी संपूर्ण मंदिराची पाहणी केली. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी संपूर्ण मंदिराचे काम पूर्ण होण्यास किमान दोन वर्षाचा कालावधी लागणार असल्याची माहिती दिली. यापैकी पहिल्या टप्प्यातील बाजीराव पडसाळी येथील काम येत्या आठ दिवसांत पूर्ण होणार आहे. मागील जवळपास दोन महिन्यापासून येथील काम सुरू होते. सध्या मंदिरातील सभामंडप येथील पूर्वीची फरशी काढण्यात आली असून येथील लाकडी सभा मंडपाची पाहणी केली जात आहे. सदर मंडपावर असणारे कौल काढण्यात येत असून यानंतर खराब झालेले लाकूड किंवा वाळवी लागलेले लाकूड काढून ते बदलण्यात येणार आहे. तसेच सदर लाकडी मंडपाचे आयुर्मान वाढविण्यासाठी त्यावर प्लॅस्टिकचा थर देऊन पावसापासून संरक्षण केले जाणार आहे. मंदिरावर असणारे सहा ते आठ इंचाचे सिमेंटचे थर देखील काढण्यात येत असून यामुळे मंदिरावरील अतिरिक्त भार कमी होणार आहे. मंदिरामध्ये काम सुरू असताना पुरातन शिलालेख अथवा वस्तू आढळल्यास त्याचे जतन देखील केले जाणार आहे.


दरम्यान, श्री विठ्ठल व रुक्मिणी गाभाऱ्यातील ग्रॅनाईट काढण्यात आले असून मूर्ती मागील ग्रॅनाईट काढण्याचे काम मात्र अत्यंत सावकाशपणे काढण्यात येणार आहे. ग्रॅनाईट, चांदी काढल्यामुळे मूळ मंदिराचं रूप समोर आलं आहे. गाभारा, चौखांबी व सोळखांबी येथील फरशी देखील काढण्यात आली आहे. तसेच श्री विठ्ठल व रुक्मिणीच्या मंदिरावरील कळसाची पाहणी करण्यात येणार आहे. या कळसावरील सिमेंट काढून टाकण्यात येणार असल्याचे वाहने यांनी सांगितले. तर मंदिरातील काही परिवार देवतांचे शिखर देखील उरविण्यात येणार आहेत.

गर्भगृहातील काम कधी पूर्ण होईल?

बैठकीमध्ये मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी, श्री विठ्ठल व रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन लवकरात लवकर सुरू करण्याचा आमचा प्रयत्न असून यासाठी पुरातत्व विभागाच्या सल्ल्याने ठेकेदाराने वेळेत कामे पूर्ण करावीत अशी सूचना दिली असल्याचे सांगितले. तसेच आषाढी पूर्वी देवाच्या गर्भगृहातील काम होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

काढलेल्या चांदीचे संवर्धन करा…

संवर्धन समितीचे सदस्य सुनील उंबरे यांनी मंदिरामध्ये काढण्यात आलेली चांदीचे नक्षीकाम वितळवून न टाकता हा अमूल्य ठेवा जसा आहे तसा भाविकांना पाहण्यासाठी उपलब्ध करुन द्यावा त्यासाठी मंदिर समितीने पुरातन वास्तूंचे संग्रहालय उभे करावे, अशी सूचना मांडली. यावर मंदिर समितीचे सहअध्यक्ष औसेकर यांनी सकारात्मक विचार करू, असे आश्वासन दिले.