Sangli Samachar

The Janshakti News

विरोधकांचा पुन्हा 'फुलटॉस', भाजपचा षटकार; मोदी 'विनर' ठरणार !सांगली समाचार - दि. ५ मार्च २०२४
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याआधीच विरोधकांनी भाजपला 'फुलटॉस' टाकला आहे. भाजपनेही ही संधी साधत थेट षटकार लगावला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच शेवटपर्यंत मैदानात राहून मॅच जिंकून देणार असल्याचा संदेश विरोधकांना दिला आहे. 2014 मध्ये 'चहावाला', 2019 मध्ये 'चौकीदार' आणि आता 2024 मध्ये 'परिवार' या शब्दाभोवती निवडणूक फिरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

बिहारमध्ये इंडिया आघाडीच्या जाहीर सभेत राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी पंतप्रधान मोदींना  कुटुंब नसल्याचे विधान केले. त्यानंतर 'मोदी का परिवार'ची जणू लाटच आली आहे. लालूंच्या या विधानावर मोदींनी काल विरोधकांना घेरले आणि संपूर्ण देशच आपले कुटुंब असल्याचे सांगितले. तीच लाइन पकडून भाजपचे सर्व नेते, पदाधिकाऱ्यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर 'मोदी का परिवार' असे लिहिण्यास सुरुवात केली आणि बघता-बघता हा ट्रेंडच सुरू झाला.


देशात अनेक ठिकाणी 'मोदी का परिवार'चे आता फलकही लागण्यास सुरुवात झाली आहे. परिवारवादावर टीका करता-करता आता भाजपचा प्रचार 'परिवार' या शब्दाभोवतीच फिरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विरोधकांनीच भाजपच्या (BJP) हाती आयते कोलित दिल्यानंतर मोदींनी त्यावर भावनिक रंग चढवून विरोधकांवर निशाणा साधला. त्यामुळे आता प्रचारात या मुद्द्याचेही भाजपकडून भांडवल केले जाणार असल्याचे सध्यातरी दिसते.

2014 मध्ये चहावाला

पंतप्रधान मोदींकडून आपण चहावाल्याचा मुलगा असल्याचे 2014 मधील निवडणुकीच्या प्रचार सभांमध्ये वारंवार सांगितले जात होते. भाजपकडून त्यावेळी 'चाय पे चर्चा' हा कार्यक्रमच हाती घेतला होता. विरोधकांकडून चहावाल्याचा मुलगा म्हणून आपल्याला हिणवले जात असल्याचे सांगत मोदी मतदारांना भावनिक आवाहन करत राहिले आणि विरोधक त्यावर टीका करत राहिले. हाच मुद्दा संपूर्ण निवडणुकीत गाजला.

2019 मध्ये चौकीदार

2019 च्या निवडणुकीआधी काही उद्योगपतींनी बँकांचे कर्ज बुडवून परदेशात पलायन केले होते. तसेच नोटबंदीवरूनही विरोधकांनी मोदी सरकारला घेरले होते. मोदींनी आपण चौकीदार असल्याचे म्हटले होते. त्यावर काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी  'चौकीदारही चोर है' असल्याचे म्हणत पलटवार केला. हाच मुद्दा भाजपने उचलला आणि 'मै हूं चौकीदार' ही मोहीम हाती घेतली. सर्व नेते पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियात आपल्या नावापुढे हे तीन शब्द जोडले आणि ट्रेंड सुरू झाला. 

'मोदी का परिवार' 
आता तिसऱ्या निवडणुकीतही असाच ट्रेंड पाहायला मिळणार आहे. 'मोदी का परिवार' याभोवती निवडणुकीत फिरणार असल्याचे भाजपकडून संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे ही निवडणूकही भावनेच्या जोरावर जिंकण्याची रणनीती आता भाजपकडून आखली गेल्याचे स्पष्ट झाले आहे. आता हा 'परिवार' मोदींना किती साथ देणार, हे निकालानंतरच स्पष्ट होईल.