Sangli Samachar

The Janshakti News

म्हणून मी इंडिया आघाडीत गेलो नाही - राजू शेट्टीसांगली समाचार - दि. २१ मार्च २०२४
शिरोळ - 'इंडिया आघाडीमध्ये या म्हणणारे भाजपबरोबर गेले. त्यामुळे कोणावर विश्वास ठेवावा, हा प्रश्न होता. शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या साथीने मी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवत आहे. मला साथ द्या. दिल्लीला पाठवा. सरकारने साखरेची निर्यात बंदी उठवल्यास मी उसाला पाच हजार रुपये दर मिळवून देईन,' अशी ग्वाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली.

गणेशवाडी (ता. शिरोळ) येथे मंगळवारी रात्री आयोजित सभेत शेट्टी बोलत होते. हातकणंगले लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार शेट्टी यांनी लोकसभेचा प्रचार सुरू केला. 

शेट्टी म्हणाले, 'लोकसभेची निवडणूक मी स्वतंत्र लढणार आहे. ज्यांना मला पाठिंबा द्यायचा आहे त्यांनी द्यावा. मला इंडिया आघाडीमध्ये या म्हणणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यादव व खासदार अशोक चव्हाण हेच भाजपबरोबर गेल्याने कुणावरही भरवसा राहिला नाही. त्यामुळे मी इंडिया आघाडीत गेलो नाही. स्वाभिमानीच्या माध्यमातून मी स्वतंत्र निवडणूक निर्णय लढवणार आहे.' 


मंगळवारी सायंकाळी आलास जिल्हा परिषद मतदारसंघातील नृसिंहवाडी, औरवाड, गौरवाड, शेडशाळ, कवठेगुलंद, गणेशवाडी गावातील प्रमुख कार्यकर्ते, शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्यावर गणेशवाडीमध्ये गणपती मंदिर परिसरात सभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम गणेशवाडी येथे राजू शेट्टींचे आगमन झाल्यावर जेसीबीतून फुलांची उधळण करीत स्वागत करण्यात आले. यावेळी सावकार मादनाईक, विठ्ठल मोरे, सागर शंभूशेटे, बंडू पाटील, जयवंत कोले, आय. आय. पटेल, नितीन शेट्टी, योगेश जिवाजे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

कर्नाटकमधून मदत

गणेशवाडी येथील सभेत कागवाड, शेडबाळ या कर्नाटकमधील शेतकऱ्यांचे मतदान नसतानासुद्धा राजू शेट्टी यांना निवडणुकीसाठी देणगी स्वरूपात रक्कम देण्यात आली.