Sangli Samachar

The Janshakti News

'वंदे भारत' एक्स्प्रेसला सांगली, मिरजेची ॲलर्जी; संपर्क क्रांती थांबाही नाकारला



सांगली समाचार - दि. १० मार्च २०२४
सांगली - देशभरात एकूण ८२ वंदे भारत एक्स्प्रेस ट्रॅकवरून धावत असताना सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांचीच या गाडीला ॲलर्जी असल्याचे चित्र आहे. कर्नाटक राज्यातील महत्त्वाच्या मार्गांवरूनही ही रेल्वे धावत आहे. मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून दुपदरीकरणाच्या कामाचे तांत्रिक कारण पुढे केले जात असले तरी कोकण मार्गावर असेच काम सुरू असतानाही वंदे भारत सुरू झाल्याने हे कारण तकलादू असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोल्हापूर ते मुंबई मार्गावर वंदे भारत सुरु होणार असल्याची घोषणा काही महिन्यांपूर्वी रेल्वेने केली होती, मात्र तीही फसवी निघाली. सांगलीतील सामाजिक संघटना, प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर याबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. सध्या मुंबई ते कोल्हापूर मार्गावर सुरू असलेल्या सर्व रेल्वे गाड्यांमध्ये कोल्हापूर पाठोपाठ सांगली रेल्वेस्थानकावरून सर्वाधिक तिकिटांचे बुकिंग होत असते. कराड व किर्लोस्करवाडी रेल्वेस्थानक दुसऱ्या क्रमांकावरचे उत्पन्न देत आहे. पाच हजार कोटी खर्च करून पुणे-सांगली-लोंढा रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण व विद्युतीकरण करण्यात आले. जेणेकरून पश्चिम महाराष्ट्रातील पुण्यासह सांगलीसारख्या प्रमुख महानगराला जलद रेल्वे गाड्यांचा संपर्क मिळावा.


सांगली जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी पुणे-लोंढा दुपदरीकरण रेल्वे प्रकल्पासाठी आपल्या जमिनी दिलेल्या आहेत. तरीही सांगली जिल्ह्यातील प्रमुख स्थानकांच्या पदरात अद्याप वंदे भारतचे सुख पडलेले नाही. कोल्हापूर-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसच्या माध्यमातून या भागातील प्रवाशांना दिलासा मिळाला होता. मात्र, हा आनंद रेल्वेने लगेचच हिरावून घेतला आहे.