Sangli Samachar

The Janshakti News

खिलाडी अक्षयकुमारला लागणार लोकसभेची लॉटरी,सांगली समाचार- दि. १ मार्च २०२४
नवी दिल्ली - सध्या सर्व राजकीय पक्षांना 2024च्या लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. भारतीय जनता पक्षाकडून (भाजप) निवडणुकीच्या तयारीला उत्साहात सुरुवात झाली आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून दोन 'खिलाडीं'ना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत चांदणी चौक लोकसभा मतदारसंघातून अभिनेता अक्षय कुमारला, तर गुरुदासपूर मतदारसंघातून क्रिकेटपटू युवराजसिंग यांना भाजपकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. या दोन्ही लोकसभा मतदारसंघातले तिकिटाचे प्रमुख दावेदार म्हणून अक्षयकुमार आणि युवराजसिंग यांच्याकडे बघितलं जात असल्याची सूत्रांची माहिती आहे. ही नावं अद्याप पक्की नसली तरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपकडून मिळणाऱ्या तिकिटाचे प्रबळ दावेदार म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

अभिनेता अक्षय कुमार याने नुकतंच कॅनडाचं नागरिकत्व सोडून भारताचं नागरिकत्व घेतलं आहे. त्याचं चांदणी चौकाशी फार जवळचं नातं आहे. अक्षय दिल्लीत लहानाचा मोठा झाला असून त्याच्या आयुष्यातल्या सुरुवातीचा बराच काळ त्याने चांदणी चौक परिसरात व्यतीत केला आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीत अभिनेता सनी देओल यांनी गुरुदासपूरमधून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती आणि जिंकली होती. 2024ला पुन्हा निवडणूक लढवण्यास आपण इच्छुक नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे तिथे युवराजसिंगला भाजपकडून संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
भाजपचे नेते डॉ. हर्षवर्धन, विष्णू मित्तल, प्रदीप खंडेलवाल हेदेखील चांदणी चौक सीटचे दावेदार असू शकतात. दिल्लीत लोकसभेच्या सात जागा आहेत. 2019मध्ये सातही जागांवर भाजपने विजय मिळवला होता. काँग्रेस आणि 'आप' यांच्यातल्या जागावाटपामध्ये 'आप'च्या वाट्याला चार, तर कांग्रेसच्या वाट्याला तीन जागा आल्या आहेत. 'आप'ने चारही जागांवर आपले उमेदवार निश्चित केले असून, नवी दिल्लीत सोमनाथ भारती, पश्चिम दिल्लीत महाबळ मिश्रा, पूर्व दिल्लीत कुलदीप कुमार, तर दक्षिण दिल्लीत सहीराम पहलवान यांना तिकीट देण्यात आलं आहे.

काँग्रेसच्या वाट्याला चांदणी चौक, नॉर्थ ईस्ट आणि नॉर्थ वेस्ट हे लोकसभा मतदारसंघ आले असून त्यापैकी चांदणी चौक जागेसाठी किती तरी दावेदार आहेत. माजी खासदार जे. पी. अगरवाल, संदीप दीक्षित यांची नावं अर्थातच आघाडीवर आहेत. पक्षातल्या वरिष्ठांकडून अलका लांबा यांच्या नावाला पसंती असल्याचं समजतं. लांबा या चांदणी चौक परिसराच्या आमदार होत्या. महिला असल्यामुळे त्यांच्या नावाला महिला मतदारांची पसंती मिळेल असा विचार करून त्यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.