Sangli Samachar

The Janshakti News

सांगली लोकसभेचे संभाव्य उमेदवार गॅसवरच ? पै. चंद्रहार पाटील धोबीपछाड मारणार की विशाल पाटील आसमान दाखवणार ?सांगली समाचार - दि. ११ मार्च २०२४
सांगली - लोकसभेची निवडणूक अगदी तोंडावर आलेली असतानाही महाराष्ट्रातील महायुती असो किंवा महाआघाडी उमेदवारीचा घोळ काही संपता संपेना. महायुतीतील विद्यमान खासदारांना नारळ दिला जाणार ? कोणाचा पत्ता कट होणार ? ही चर्चा रंगलेली असतानाच, सांगली लोकसभा मतदारसंघातही महायुतीत असो वा महाआघाडीत कोण बाजी मारणार ही चर्चा दिसून येत आहे.
सांगलीचे विद्यमान खासदार संजय काका पाटील यांच्याबाबत पक्षांतर्गत व मतदारातील नाराजी असल्याचा अहवाल पक्ष श्रेष्ठींकडे पोहोचला असल्याने आपल्याला पुन्हा तिकीट मिळणार का ? हे प्रश्नचिन्ह घेऊन संजय काका अजूनही मतदारसंघात पेरणी करताना दिसत आहेत. विविध कार्यक्रमातून ते स्वतः व त्यांच्या पत्नी तसेच कुटुंबीय आणि त्यांचे समर्थक प्रचारात गुंतलेले दिसत आहेत.


दुसरीकडे महाआघाडीतून सांगलीची जागा कोण लढवणार ? हा सस्पेन्स कायम आहे. काँग्रेसचे जिल्हा पातळीवरील असो वा राज्य पातळीवरील नेते सांगलीची जागा विशाल पाटील यांनाच मिळणार व लोकसभेत काँग्रेसचाच खासदार जाणार असे रान उठवीत आहेत. विशाल पाटील हे, गेल्या लोकसभा निवडणुकीत मिळालेले अपयश पचवत, गेली पाच वर्ष जोमाने कामाला लागलेले आहेत. विविध कार्यक्रमातून त्यांनी चांगला जनसंपर्क निर्माण केलेला आहे. तर पक्षांतर्गत विरोधकांशी जुळवून घेत बेरजेचे राजकारण चालू ठेवले आहे. काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी मिळाली तर भाजपाच्या अंतर्गत संघर्षाचा व संजय काका विरोधातील परिस्थितीचा विशाल पाटील यांना निश्चित फायदा होऊ शकतो.
मात्र याच वेळी कोल्हापूरच्या बदल्यात जागा सांगलीची ठाकरे गटाला आंदण देऊन, पै. चंद्रहार पाटील या नव्या दमाच्या चेहऱ्याला पुढे आणत, विशाल पाटलांचा पत्ता कट करण्याची खेळी आघाडीतूनच सुरू आहे. आता याला काँग्रेसची वरिष्ठ मंडळी बळी पडतात की विरोध पत्करून उमेदवारी विशाल पाटील यांनाच उमेदवारी देतात, यावर पुढील गणिते अवलंबून आहेत.
पै. चंद्रहार पाटील यांनीही गेले काही दिवस लोकसभेच्या निवडणुकीसाठी जोर बैठका मारणे सुरू ठेवले आहे. बैलगाडी शर्यत असो व इतर कुठला कार्यक्रम तरुणांचे संघटन बांधून आपले नाव चर्चेत ठेवले आहे. अशातच आज त्यांचा ठाकरे शिवसेनेत प्रवेश होत आहे. ठाकरे गटाची सांगली ताकद किती ? हा प्रश्न गौण असून, पै. चंद्रहार पाटील हे आर्थिक दृष्ट्या सक्षम असले तरी इतर "थंडाई" कोण पुरवते ? यावर त्यांची ताकद वरचढ ठरू शकते. या पार्श्वभूमीवर निवडणुकीतील डावपेच कोण कसे खेळते ? आणि विशाल पाटील व काँग्रेसची नेते मंडळी कसे प्रति डावपेच टाकते यावर चर्चा रंगलेल्या आहेत.
येत्या दोन-तीन दिवसात उमेदवारीवर शिक्का मुहूर्त झाल्यानंतरच सांगली लोकसभा निवडणुकीची रंगत अधिक रंगणार आहे, तोपर्यंत चर्चेचे हे गु-हाळ असेच सुरू राहणार हे नक्की...