Sangli Samachar

The Janshakti News

एवढे तर महात्मा गांधी देखील चालले नाहीत.; जितेंद्र आव्हाडांचे वादग्रस्त वक्तव्यसांगली समाचार  - दि. १३ मार्च २०२४
मुंबई  - राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतात. ठाण्यात मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत आव्हाडांनी पून्हा एकदा वाद निर्माण होईल, असे वक्तव्य केले आहे. काँग्रेस नेता राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मंगळवारीच महाराष्ट्रात आली आहे. त्याबाबत बोलताना महात्मा गांधींपेक्षा राहुल गांधी जास्त चालतात, असे वादग्रस्त विधान आव्हाड यांनी केले आहे. आव्हाडांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. दरम्यान, महाविकास आघाडीत या वादामुळे अंतर्गत कलह होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.

महात्मा गांधींचे प्रत्येक आंदोलन पायी पण…

राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सध्या महाराष्ट्रात आली आहे. यापूर्वी देखील त्यांनी भारत जोडो यात्रा काढली होती. याबाबत जितेंद्र आव्हाड बोलत होते. आव्हाड म्हणाले, महात्मा गांधीचे प्रत्येक आंदोलन हे पायी झाले होते. पण, राहुल गांधी तीन हजार सहाशे किलोमीटर चालले आहेत. इतके तर महात्मा गांधी सुद्धा चाललेले नाहीत, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाचे आ. जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. असे वक्तव्य करून आव्हाडांनी एकप्रकारे महात्मा गांधीचा अवमान केल्याची चर्चा रंगली आहे.


काँग्रेस नेता राहुल गांधी १६ मार्च रोजी ठाण्यात येत आहेत. त्या संदर्भात आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत आव्हाड बोलत होते.राहुल गांधी जेव्हा पहिल्यांदा चालायला निघाले तेव्हा टिंगल टवाळी होत होती. लोक हसत होते. हे चार - आठ दिवसांचे नाटक आहे, अशी खिल्ली उडवली गेली. तरीही ते थांबले नाहीत. खरं तर भारतीयांच्या दृष्टीने चालण्याला महत्त्व आहे, हे सांगतानाच त्यांनी राहुल गांधींच्या चालण्याचे कौतुक केले.

पूर्वीही वादग्रस्त विधाने

जितेंद्र आव्हाड यापूर्वी देखील अशाच प्रकारे वक्तव्ये करून वादात सापडले आहेत. राम मंदिराचे उद्घाटन होण्यापूर्वी शिर्डी येथे झालेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात त्यांनी राम मांसाहारी होता, असेदेखील म्हटले होते. या वक्तव्यामुळेही आव्हाडांवर सर्वच स्तरातून टीकेची झोड उठविली गेली. त्यानंतर आता राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल वक्तव्य केल्याने ते पुन्हा एकदा टीकेचे लक्ष्य बनले आहेत.

ठाण्याच्या जागेचा भाजपाशी काय संबंध?

ठाण्याची जागा शिवसेनेची हक्काची जागा असून ती त्यांनाच मिळायला हवी, असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. ज्या हक्काने शिवसेनेने ही जागा जिंकली आहे, त्या हक्काने आम्ही विरोधात असलो तरी ती जागा एकनाथ शिंदे यांनाच मिळायला हवी, असा दावा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. अचानक आव्हाडांना शिंदेंचा इतका पुळका का आला, अशीही चर्चा सुरू झाली.