Sangli Samachar

The Janshakti News

अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या घड्याळाची टिकटिक बंद होणार ?सांगली समाचार- दि. १४ मार्च २०२४
नवी दिल्ली - शरद पवार यांच्याकडून राष्ट्रवादी व घड्याळ चिन्हासह पक्षाचा झेंडा अजित पवार यांच्या ताब्यात केला परंतु आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या घड्याळाची टिक टिक बंद होईल अशी शक्यता निर्माण झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या अर्जावर सुनावणी करताना अजित पवार यांच्या पक्षाने स्वतंत्र चिन्ह घ्यावे अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. याबाबत शरद पवार यांचा फोटोही अजित पवार गटाच्या सदस्यांनी वापरू नये असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच त्याबाबतचे प्रतिज्ञापत्र देण्यास सांगितले आहे. यामुळे अजित पवार गटाला स्वतंत्र चिन्ह घ्यावे लागण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या मध्यात जर काही निर्णय झाला तर अडचणी येऊ शकते. त्यामुळे अजित पवार गटाने स्वतंत्र चिन्ह घ्यावे, असे आम्ही सुचवीत आहोत. याबाबत तुम्ही विचार करावा, असे सर्वोच्च न्यायालयाने आज सांगितले.

घड्याळ आणि शरद पवार यांचे छायाचित्र कसे वापरता येईल? ही तर फसवणूक आहे. याचा उपयोग ग्रामीण भागात त्यांच्या फायद्यासाठी होईल, असे तुमचे नेते सांगतात. माझ्याकडे एक नवीन चिन्ह आहे. त्यांना घड्याळाव्यतिरिक्त कोणतेही चिन्ह वापरू द्या. घड्याळाचा शरद पवारांच्या ओळखीशी अतूट संबंध आहे, असे सिंघवी यांनी युक्तिवादादरम्यान सांगितले.


समजा तुमच्याकडे तुमच्या आवडीचे चिन्ह आहे. त्यांना आधीच चिन्ह मिळाले आहे. हे चिन्ह तुम्ही कोणत्याही निवडणुकीत वापरू शकता. यामुळे विनाव्यत्यय, तंटामुक्त प्रक्रिया असेल, असे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सूचित केले.

शरद पवार गट आणि अजित पवार गट यांचे दोन स्वतंत्र पक्ष असताना दुसऱ्या पक्षातील नेत्याच्या फोटोचा नावाचा वापर करणे चूक आहे. हा मतदारांना भुलवण्याचा प्रयत्न आहे, असा युक्तिवाद शरद पवार गटाच्या वतीने करण्यात आला होता. या प्रकरणावरील सुनावणी पुन्हा एकदा येत्या मंगळवारी (१९ मार्च) होणार आहे.

न्यायालयात काय घडले ?

अजित पवार गटाच्या वतीने माझा फोटो वापरला जातो, अशा पद्धतीचा अर्ज सर्वोच्च न्यायालयात अभिषेक मनु सिंघवी यांच्या माध्यमातून शरद पवारांनी दाखल केला होता. त्यासोबतच मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना शरद पवारांचा फोटो वापरण्याचे आवाहन केले होते. यावर आजच्या सुनावणीदरम्यान, न्यायालयाने नाराजी व्यक्त करत 'निवडणुकीच्या वेळीच तुम्हाला शरद पवार आठवतात आणि तुम्ही त्यांचा फोटो वापरता,' अशी तंबी देतानाच अशी वेळ येऊ देऊ नका की आम्हाला तुमचे घड्याळ चिन्ह काढून घ्यावे लागेल.' त्यानंतर 'आम्ही दोन दिवसात शरद पवारांचे नाव, फोटो वापरणार नाही' असे प्रतिज्ञापत्र न्यायालयाला देणार असल्याचे अजित पवार गटाचे वकील मुकुल रोहतगी आणि मनिंदर सिंग यांनी न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने अजित पवार गटाचे हे म्हणणे ऐकून घेत शनिवारपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले.