Sangli Samachar

The Janshakti News

मोदी सरकारकडून लोकांना पाठवले जातायत व्हॉट्सॲप मेसेज, काँग्रेस पक्ष भडकला!सांगली समाचार - दि. १८ मार्च २०२४
नवी दिल्ली - आपल्याला सरकारकडून व्हॉट्सॲपवर एक मेसेज आला असेल? सरकार 'विकासित भारत संपर्क' नावाच्या व्हॉट्सॲप अकाउंटवरून लोकांच्या मोबाईलवर हा मेसेज पाठवून फीडबॅक मागवत आहे. मात्र आता, या मेसेजवरून राजकीय वादही सुरू झाला आहे. निवडणुका जाहीर झाल्यानंतरही भाजप आपल्या प्रचारासाठी सरकारी यंत्रणेचा वापर करत असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. सरकारकडून पाठवण्यात येत असलेल्या या मेसेसोबत पंतप्रधान मोदींचे एक पत्रही आहे. सरकारच्या डेटाबेसचा वापर करून राजकीय प्रचार केला जात असल्याचे विरोधकांनी म्हटले आहे.

काँग्रेसच्या केरळ युनिटने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर व्हॉट्सॲपची मूळ कंपनी असलेल्या मेटाला टॅग करत म्हटले आहे की, विकसित भारत संपर्क नावाच्या व्हेरिफाइड बिझनेस अकाउंटवरून लोकांना मेसेज पाठवला जात आहेत. या मेसेजमध्ये लोकांकडून फिडबॅक मागवला जात आहे. यासोबत जोडलेले पीएम मोदींचे पत्र राजकीय प्रचाराशिवाय दुसरे काही नाही. या माध्यमातून पंतप्रधान मोदी आपल्या पक्षाचा प्रचार करत असून सरकारी डेटाबेसचा वापर केला जात आहे. अशा परिस्थितीत व्हॉट्सॲपचाही राजकारणासाठी गैरवापर होत आहे.


केरळ काँग्रेसने सरकारच्या पॉलिसीचा स्क्रीनशॉटही शेअर केला आहे. यात, कंपनी कुठलाही राजकीय पक्ष, राजकारणी, राजकीय उमेदवार अथवा राजकीय प्रचारासाठी मेसेजिंग ॲप वापरण्यास कंपनीची मनाई आहे, असे म्हणण्यात आले आहे. यावर, ही कंपनीची पॉलिसी असेल तर, एका राजकीय नेत्याला प्रचारासाठी हा प्लॅटफॉर्म का देण्यात आला ? की भाजपसाठी आपले काही वेगळे धोरण आहे? असा प्रश्न काँग्रेसने केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांसाठी एक पत्र जारी करत विकसित भारतासंदर्भात त्यांच्या प्रतिक्रिया मागवल्या आहेत. विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी तुमची साथ आणि तुमच्या सूचना अत्यंत महत्त्वाच्या आहेत. यामुळे या योजनांसंदर्भात आपले मत नोंदवावे ही विनंती, असे या मेसेजमध्ये म्हणण्यात आले आहे. 2047 पर्यंत देशाचा विकास करण्याचे स्वप्न दाखवणे हीं भाजपची राजकीय खेळी असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे.