Sangli Samachar

The Janshakti News

ठाकरेंच्या पैलवानाला काँग्रेस नडणार; नेत्यांचा आक्रमक पवित्रा
सांगली समाचार - दि. २२ मार्च २०२४
सांगली - सांगली लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे पक्षपमुख उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्याने महाविकास आघाडीत खळबळ उडाली आहे. जिल्हा काँग्रेसचे नेते आक्रमक झाले असून, त्यांनी विशाल पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्याची मागणी प्रदेश समितीकडे केली आहे. सांगलीत आता काँग्रेसनेदेखील लढण्याचा पवित्रा घेतल्याने महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे.

सांगली लोकसभेच्या  जागेवरून गेल्या पंधरा दिवसांपासून शिवेसना व काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. दहा दिवसांपूर्वी शिवसेनेचे उद्धव ठाकरे व संजय राऊत यांनी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना शिवसेनेत पक्षप्रवेश देऊन उमेदवारी जाहीर केली होती. या वेळी काँग्रेसने नाराजी व्यक्त केली होती. आमदार विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील नेत्यांनी प्रदेश व केंद्रीय पातळीवरील नेत्यांची भेट घेऊन काँग्रेसला उमेदवारी देण्याची मागणी केली होती. शिवाय कोणत्याही परिस्थितीत ही जागा सोडणार नसल्याचा इशारा दिला होता.


त्यानुसार महाविकास आघाडीच्या दोन-तीन वेळा बैठका पार पडल्या. या बैठकीत सांगलीचा विषय चांगलाच गाजला. तोडगा निघाला नाही, पण गुरुवारी मिरजेत झालेल्या शिवसेनेच्या जनसंवाद मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी घोषित केली.

काँग्रेस सांगलीत लढणारच : आमदार विक्रमसिंह सावंत 

महाविकास आघाडीचा जागावाटपाचा निर्णय अद्याप झालेला नाही. तरीदेखील सांगलीत येऊन शिवसेनेच्या नेत्यांनी उमेदवार जाहीर केला आहे. यामध्ये आम्हाला विश्वासात घेतले नाही. पण ही बाब काँग्रेस प्रदेश समितीच्या निदर्शनास आणून शुकवारी काँग्रेसचे उमेदवार म्हणून विशाल पाटील यांची घोषणा करावी, यासाठी आग्रह धरणार आहे. कोणत्याही परिस्थितीत सांगलीत काँग्रेस लढणार असल्याचे आमदार सावंत यांनी स्पष्ट केले.


काँग्रेसच्या यादीत विशाल पाटलांचे नाव ?

काँग्रेसचे नेते आक्रमक झाले आहेत. त्यांनीदेखील प्रदेश काँग्रेसकडे विशाल पाटील यांची उमेदवारी घोषित करावी, अशी मागणी केली आहे. शिवाय काँग्रेसच्या राज्यातील 18 जणांच्या यादीत विशाल पाटील यांचे नाव असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे विशाल पाटील यांच्या उमेदवारीची घोषणादेखील होण्याची शक्यता आहे. त्यासाठी जिल्ह्यातील नेते मंडळी मुंबईला जाणार आहेत.