Sangli Samachar

The Janshakti News

यंदाची लोकसभा निवडणुक ठरणार महागडी; करोडो रुपये खर्च होण्याचा अंदाज



सांगली समाचार - दि. २१ मार्च 
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या तारखा अखेर जाहीर झाल्या आहेत. यासाठी सर्वच राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी तयारी सुरु केली आहे. तसे पाहायला गेले तर, निवडणुका जिंकण्यासाठी राजकीय पक्ष आणि उमेदवार पाण्यासारखा पैसा खर्च करतात. निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा निश्चित केली असली तरी पक्षांवर कोणतेही बंधन नाही.

सार्वत्रिक निवडणुका घेण्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च केले जातात. सेंटर फॉर मीडिया स्टडीजचा अंदाज आहे की, यावेळी सार्वत्रिक निवडणुकीत 1.20 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च होऊ शकतो. असे झाल्यास ही जगातील आतापर्यंतची सर्वात महागडी निवडणूक ठरेल.


निवडणुकांचा खर्च कोण करतात?

निवडणूक खर्च दर पाच वर्षांनी दुप्पट होत आहे. 2019 च्या निवडणुकीत 60 हजार कोटी रुपये खर्च केले जातील असा अंदाज आहे. तर याआधी 2014 मध्ये सुमारे 30 हजार कोटी रुपये खर्च झाल्याचे सांगण्यात येते. निवडणुका घेण्याचा संपूर्ण खर्च सरकार उचलतात. लोकसभा निवडणुकाचा सर्व खर्च केंद्र सरकार उचलतात. तर विधानसभा निवडणुकीचा खर्च राज्य सरकारे उचलतात. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेतल्यास खर्चाची विभागणी केंद्र आणि राज्य यांच्यात होते.

मागील काही निवडणुकांमध्ये झालेला खर्च किती? 

निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत 10.45 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. 2004 च्या निवडणुकीत पहिल्यांदाच हा खर्च 1000 कोटींच्या पुढे गेला होता. त्या निवडणुकीत 1,016 कोटी रुपये खर्च झाले. 2009 मध्ये 1,115 कोटी रुपये आणि 2014 मध्ये 3,870 कोटी रुपये खर्च झाला.

उमेदवारावर खर्चाची मर्यादा 

लोकसभा निवडणुकीकरीताप्रत्येक उमेदवाराला खर्चाची मर्यादा 95 लाख इतकी ठेवण्यात आलेली आहे. तसेच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीकरिता प्रत्येक उमेदवाराला खर्चाची मर्यादा 40 लाख इतकी आहे. राजकीय पक्षांच्या व उमेदवारांच्या जाहिराती प्रमाणिकरण करण्यासाठी राज्यस्तरावर व जिल्हास्तरावर माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे या समितीकडून पेड न्यूज संदर्भातही प्राप्‍त होणाऱ्या तक्रारींवर कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.

राजकीय पक्ष कोणत्या गोष्टींवर करतात सर्वाधिक खर्च ? 

राजकीय पक्ष प्रसिद्धी, उमेदवार आणि प्रवास यातीन गोष्टींवर सर्वाधिक खर्च करतात. निवडणूक प्रचारादरम्यान पक्षांचे स्टार प्रचारक दिवसभर अनेक सभा घेतात. त्यासाठी हेलिकॉप्टर सेवा वापरली जाते. 2019 मध्ये, एकट्या भाजपने प्रवासासाठी अंदाजे 250 कोटी रुपये खर्च केले होते. गेल्या लोकसभा निवडणुकीत राजकीय पक्षांनी प्रचारावर सुमारे 1,500 कोटी रुपये खर्च केले. त्यापैकी सात राष्ट्रीय पक्षांनी 1,223 कोटी रुपयांहून अधिक खर्च केला आहे. भाजप आणि काँग्रेसने प्रचारावर सर्वाधिक खर्च केला होता. भाजपने 650 कोटी रुपये तर काँग्रेसने 476 कोटी रुपये खर्च केले आहेत.

यावेळी किती खर्च येईल?

यंदाच्या निवडणुकीत 1.20 लाख कोटी रुपये खर्च केले जातील, असा अंदाज आहे. त्यापैकी केवळ 20 टक्के खर्च निवडणूक आयोग करणार आहे. उर्वरित खर्च राजकीय पक्ष आणि उमेदवार उचलतील.