Sangli Samachar

The Janshakti News

विश्वजीत कदम-विशाल पाटलांच्या दिल्लीवारीनंतर चक्रं फिरली, ट्रायडंट हॉटेलमध्ये मविआची तातडीची बैठक, सांगलीचा तिढा सुटणार?



सांगली समाचार - दि. २८ मार्च २०२४
सांगली - सांगली लोकसभा मतदारसंघावरुन महाविकास आघाडीमध्ये सध्या अंतर्गत नाराजी वातावरण आहे. सांगलीच्या जागेसाठी उद्धव ठाकरे यांनी परस्पर चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा केली होती. त्यामुळे काँग्रेसचे नेते नाराज झाले होते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सांगलीतून काँग्रेसचे विशाल पाटील  यांनी उमेदवारी जवळपास निश्चित होती. मात्र, ठाकरेंनी परस्पर आपला उमेदवार रिंगणात उतरवल्याने पेच निर्माण झाला होता. ठाकरे गटाकडून बुधवारी प्रसिद्ध केलेल्या लोकसभा उमेदवारांच्या यादीतही चंद्रहार पाटील यांचे नाव होते. त्यामुळे डॉ. विश्वजीत कदम, आ. विक्रमसिंह सावंत, पृथ्वीराज पाटील आणि विशाल पाटील यांनी थेट दिल्ली गाठली होती. या सर्वांनी दिल्लीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांची भेट घेतली. या भेटीनंतर सांगली मतदारसंघाबाबत मविआच्या नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे.

विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांनी सांगली मतदारसंघाबाबतची आपली बाजू हायकमांडसमोर मांडल्यानंतर आपण याबाबत शिवसेना नेत्यांशी बोलू, असे आश्वासन त्यांना देण्यात आले होते. या भेटीनंतर अवघ्या काही तासांमध्ये मुंबईत महाविकास आघाडीची बैठक निश्चित करण्यात आली आहे. मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये गुरुवारी दुपारी 4 वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले हे नेते उपस्थित राहणार आहेत. काँग्रेस नेत्यांनी सांगलीच्या जागेबाबत आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे या बैठकीत काय चर्चा होते, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. उद्धव ठाकरे यांनी सांगलीतून चंद्रहार पाटील यांना माघार घ्यायला सांगावी आणि विशाल पाटील यांच्यासाठी मार्ग मोकळा करावा, असा प्रस्ताव काँग्रेसकडून मांडला जाऊ शकतो. यावर उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल. याशिवाय, दक्षिण मध्य मुंबई, वायव्य मुंबई आणि उत्तर मुंबई या मतदारसंघाबाबतही मविआ नेत्यांच्या बैठकीत चर्चा होऊ शकते.

सांगलीच्या जागेसाठी डॉ. विश्वजीत कदम इरेला पेटले.

काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात विशाल पाटील यांनी विश्वजीत कदम हे आमच्या विमानाचे पायलट आहेत, ते नेतील तिकडे आम्ही जाऊ, असे म्हटले होते. हे वक्तव्य करुन विशाल पाटील यांनी एकप्रकारे आपल्याला विश्वजीत कदम यांचे नेतृत्त्व मान्य असल्याचे संकेत दिले होते. आता सांगलीच्या जागेवर ठाकरे गटाने दावा सांगितल्यानंतर विश्वजीत कदम एखाद्या नेत्याप्रमाणेच आपल्या सहकाऱ्याच्या मदतीला धावून आले आहेत. विश्वजीत कदम हे बुधवारी विशाल पाटील यांना घेऊन दिल्लीत गेले होते. त्यांनी दिल्लीत मल्लिकार्जून खरगे यांची भेट घेऊन सांगली लोकसभेबाबत आपली भूमिका मांडली. सांगली हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाला हवा आहे, याठिकाणी निवडणूक लढवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. ही जागा कशाप्रकारे काँग्रेसची आहे आणि विशाल पाटील यांनाच उमेदवारी का मिळाली पाहिजे, यासाठी विश्वजीत कदम यांनी दिल्लीत हायकमांडसमोर बाजू मांडली.