सांगली समाचार - दि. २९ मार्च २०२४
मुंबई - लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाचा प्रचार न करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतल्याची चर्चा आहे. अजित पवार गटाने आपल्या स्टार प्रचारकांची यादी आज जाहीर केली. त्यात मोदी, शहा तर दूरच, भाजपच्या एकाही नेत्याचा समावेश नाही. अगदी शिंदे गटाचे सरदार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही नाव नाही. यामुळे प्रचारात अजित पवार गटाला एकटे पाडले जाणार की काय असेही चित्र आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीमधील भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटानंतर अजित पवार गटानेही स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. अजित पवार गटाचे राष्ट्रीय सरचिटणीस एस. आर. कोहली यांनी ही 37 जणांची यादी जाहीर केली. भाजप आणि शिंदे गटाच्या स्टार प्रचारकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे. भाजपाबरोबर महायुतीत असलेल्या अजित पवार गटाच्या स्टार प्रचारकांमध्ये मात्र मोदी, शहा किंवा एकही केंद्रीय मंत्री नाही. अगदी राज्यातील भाजपचे मंत्रीही नाहीत.
मोदी आणि शहांनी जाणीवपूर्वकच अजित पवार गटाच्या प्रचाराला न जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटण्यापूर्वी काही दिवस आधीच पंतप्रधान मोदी यांनी जाहीर सभेमध्ये राष्ट्रवादीवर 70 हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. पंतप्रधानांनीच इतका गंभीर आरोप केल्याने आता तपास यंत्रणांचा ससेमिरा मागे लागणार या भीतीने अजित पवारांनी राष्ट्रवादीतून 40 आमदार घेऊन महायुतीत प्रवेश केला. आता त्याच अजित पवार गटासाठी मते मागितली तर मतदारांमध्ये चुकीचा संदेश जाईल आणि त्याचा फटका निवडणुकीत बसेल या शक्यतेनेच मोदी, शहांसह भाजपचे नेते अजित पवार गटापासून दूर राहिल्याचे बोलले जात आहे. असे असले तर मग अजित पवारांचा समावेश भाजपच्या स्टार प्रचारकांमध्ये का केला गेला, असाही सवाल उपस्थित केला जात आहे.