Sangli Samachar

The Janshakti News

महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटणार ? अमित शाहांची शिंदे-फडणवीस-पवारांसोबत आज बैठकसांगली समाचार - दि. ५ मार्च २०२४
मुंबई  - आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीला 400 हून अधिक जागा मिळवण्यासाठी भाजपने चंग बांधला आहे. यात 370 जागा या फक्त भाजपच्याच असतील, असा दावाही करण्यात येत आहे. याच धर्तीवर महायुतीतील घटक पक्षांनी महाराष्ट्रात 48 पैकी 45 जागा मिळवण्याचे ध्येय बाळगले आहे.

दरम्यान, महायुतीत जागावाटात एकवाक्यता नसल्याने राज्यात तिढा कायम आहे. यावर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह मंगळवारी (ता. 5) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत बैठक घेणार असल्याची माहिती आहे.  राज्यात महायुतीतील भाजपला 32, शिवसेना शिंदे गटास 12 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 4 जागा अशा फॉर्म्युल्याची चर्चा आहे. यावर शिंदे गटासह राष्ट्रवादीनेही नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्यात महायुतीतील लोकसभा जागावाटपाचा तिढा कायम आहे. दरम्यान, भाजपने आपली लोकसभेच्या 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.


या यादीत महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश नसल्याने चर्चांना उधाण आले आहे. हा तिढा सोडवण्यासाठीच अमित शाह (Amit Shah) हे शिंदे-फडणवीस-पवारांसोबत बैठक घेणार असल्याचे बोलले जात आहे. या बैठकीनंतर दुसऱ्या यादीत राज्यातील उमेदवारांचा समावेश असण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे. लोकसभेच्या निवडणुका  एप्रिल किंवा मे महिन्यात होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अमित शहा आज 5 मार्च रोजी महाराष्ट्रातील अकोला, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर येथे भाजपच्या निवडणूक संबंधित बैठका आणि कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. चंद्रपूर, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वर्धा आणि अमरावती या मतदारसंघांबाबतही ते आढावा घेणार आहेत. अकोल्यानंतर शहा जळगाव येथील पक्षाच्या कार्यक्रमात संबोधित करणार आहेत. त्यानंतर सायंकाळी छत्रपती संभाजीनगर येथे शाह यांची जाहीर सभा होणार आहे.

दरम्यान, शहा यांच्या दौऱ्यापूर्वीच 4 मार्चला भाजप अध्यक्ष जे. पी नड्डा नागपुरातील 'नमो युवा संमेलना'त तरुणांशी संवाद साधणार आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 6 मार्च रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 'नारी शक्ती वंदना' कार्यक्रमाला संबोधित करणार असल्याचेही भाजप नेत्यांनी सांगितले आहे. या पाठोपाठ कार्यक्रमांनी राज्यात भाजपने वातावरण तापवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.