सांगली समाचार - दि. ५ मार्च २०२४
गल्लीपासून दिल्लीपर्यंत कुठलीही निवडणूक असली तरी इच्छुकांना पंख फुटतात आणि त्यांची संख्या जास्त असेल तर नाराजीचे निखारे फुलू लागतात. आपल्याला संधी मिळाली नाही तर स्वतः किंवा हस्ते पर हस्ते संघटना वा पक्षप्रमुखांपर्यंत ही नाराजी पोहोचवण्यात येते. याची ज्येष्ठांनी दखल घेतली नाही, तर संघटना व पक्ष सोडण्याची भीती दाखवण्यात येते. तरीही डाळ शिजली नाही, तर संबंधित संघटनेतून वा पक्षातून बाहेर पडून स्वतःच्या ताकदीचे प्रदर्शन करून दुसऱ्या संघटनेत वा पक्षात प्रवेश केला जातो.
असाच प्रकार सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गल्लीपासून दिल्लीपर्यंत दिसून येत आहे. याला कुठलीही संघटना व पक्ष अपवाद नाही. सर्वात जास्त नाराजी आहे ते "ऐतिहासिकचे लेबल" लावलेल्या काँग्रेस पक्षात. राज्यातील तसेच देशातील अनेक दिग्गज नेत्यांनी राम ठोकून सध्या चलती असलेल्या भाजपचे कमळ हातात घेतल्याचे दिसून येत आहे. थोडक्यात काय तर...
"निवडणुकीची पहिली घंटा वाजली;
नाराजीनाट्याची वेळ झाली..."
असे म्हणावे लागत आहे.
मात्र या पळापळीच्या किंवा पळवा पळवीच्या खेळाचा परिणाम होतो आहे, तो पक्षातील मूळ निष्ठावंतांवर... आयात झालेल्या किंवा केलेल्या नवख्या आयारामाला तिकीट मिळाले किंवा तशी शक्यता जरी निर्माण झाली, तरी मूळ कार्यकर्ते व नेत्यांकडून नाराजी व्यक्त होत असून याचा फटका निवडणुकीच्या निकालावर दिसू शकतो. हेच चित्र सध्या सर्वत्र दिसत असून सर्वच पक्षातील आयाराम गयारामावर तोंड सुख घेण्यात येत आहे. "आम्ही काय फक्त सतरंज्याच उचलायच्या काय ?" किंवा "आम्ही काय फक्त ढोल ताशा व फटाके वाजवायचे काय ?" असा सवाल विचारला जात आहे.
सांगली लोकसभा निवडणुकीपुरता विचार करायचा झाला तर... सध्या कुठलाच इच्छुक पक्ष सोडण्याच्या मनस्थितीत दिसून येत नसला तरी, लोकसभेचे तिकीट कोणाला मिळणार ? यावरून वातावरण तापलेले आहे. भाजपमध्ये संजयकाका पाटील की पृथ्वीराज देशमुख ? याचा खल सुरू असताना दुसरीकडे काँग्रेस पक्षात विशाल दादा पाटील यांना पर्याय नसल्याने त्यांच्या वाटेत काटे पसरण्याचे काम सुरू आहे. "मला नाही तर तुलाही मिळू देणार नाही" असा बालिश प्रकार विशाल दादा पाटलांच्या बाबतीत घडत आहे. सांगली मतदारसंघावर उद्धव ठाकरे गटाने अचानक दावा का सांगितला हे उघड गुपित आहे...
निवडणूक आयोग कोणत्याही क्षणी निवडणुका जाहीर करू शकते. लोकसभेच्या विस्ताराचा विचार करता, उमेदवारांना प्रचारासाठी खूप कमी वेळ मिळणार आहे. त्यामुळे सर्वच इच्छुकांनी आपल्यालाच उमेदवारी मिळावी म्हणून देव पाण्यात ठेवलेले आहेत. आता ज्या मतदारांसाठी निवडणुका होतात ? तो मतदार राजा कोणाच्या पारड्यात आपले मत टाकतो ? यावर कोणत्या उमेदवाराच्या गळ्यात विजयाची माळ पडणार हे ठरणार आहे... पाहू... घोडा मैदान जवळच आहे... काय निकाल लागतो !