Sangli Samachar

The Janshakti News

जागा कमी, मित्रपक्ष जास्त... महाराष्ट्रापासून या राज्यांपर्यंत भाजपासाठी जागावाटप ठरतेय डोकेदुखीसांगली समाचार - दि. ९ मार्च २०२४
नवी दिल्ली - अब की बार ४०० पार म्हणत भाजपाने यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकलं आहे. तसेच ४०० जागांच्या दिशेने आगेकूच करण्यासाठी भाजपाने मागच्या काही महिन्यांत अनेक अनेक मित्रपक्ष जोडले आहेत. उत्तर प्रदेशात आरएलडी, बिहारमध्ये जेडीयू हे मित्रपक्ष एनडीएमध्ये परतले आहेत. तर ओदिशामध्ये बीजेडी, आंध्र प्रदेशमध्ये टीआरएस हे जुने मित्रपक्ष एनडीएमध्ये येण्याच्या तयारीत आहेत. ४०० पारचं लक्ष्य गाठण्यासाठी भाजपा आपले मित्रपक्ष वाढवत आहे. मात्र त्यामुळे जागावाटपाबाबतचं आव्हान भाजपासमोर उभं राहिलं आहे. 

जागा कमी आणि मित्रपक्ष अधिक झाल्याने महाराष्ट्रापासूनबिहार, ओदिशा आणि आंध्र् प्रदेश या राज्यांमध्ये भाजपाची डोकेदुखी वाढली आहे. उत्तर प्रदेशात भाजपाने आरएलडी, सुभासपा, निषाद पार्टी, अपना दल सोनेलाल या पक्षांसोबत आघाडी केली आहे. मात्र ८० जागा असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये भाजपाने या चार पक्षांची केवळ ६ जागांवर बोळवण केली आहे. आता भाजपाला हाच फॉर्म्युला इतर राज्यांमध्ये अवलंबायचा आहे. मात्र प्रत्येक राज्यात परिस्थिती वेगळी असल्याने भाजपासमोर पेच निर्माण झाला आहे. ही बाब बिहार आणि महाराष्ट्रामध्ये प्रकर्षाने दिसत आहे.


महाराष्ट्रामध्ये शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट समाधानकारक जागा मागत आहेत. मात्र लोकसभेच्या ४८ जागा असलेल्या महाराष्ट्रात भाजपाला अधिकाधिक जागा जिंकायच्या आहेत. त्यामुळेच ३० हून अधिक जागांवर भाजपाकडून दावा केला जात आहेत. मिळत असलेल्या माहितीनुसार सध्या महाराष्ट्रात भाजपा ३२ लढेल. तर शिवसेना शिंदे गट १० आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार ३ जागा दिल्या जातील आणि उर्वरित ३ जागांवर शिंदे गट आणि अजित पवार गटातील उमेदवारांना लढवलं जाण्याची शक्यता आहे. मात्र शिवसेना शिंदे गटाकडे सध्या १३ जागा आहेत. त्यामुळे शिंदे गटाला दहाच जागा दिल्या गेल्या तर उर्वरित खासदारांचं काय होणार, हाही प्रश्न उपस्थित होणार आहे. तर अजित पवार गटाला केवळ ३ जागांवर कसं जुळवून घ्यायला लावायचं हेही भाजपासमोरील आव्हान असेल. त्यामुळे महाराष्ट्रातील जागावाटप हे भाजपासाठी डोकेदुखी ठरणार आहे.

दुसरीकडे लोकसभेच्या ४० जागा असलेल्या बिहारमध्येही जागावाटप ही भाजपासाठी डोकेदुखी ठरलेली आहे. बिहारमध्ये एनडीएत भाजपासह सहा पक्ष आहेत. त्यात सर्वाधिक जागा भाजपाला लढवायच्या आहेत. मात्र असं करत असताना जेडीयू, हम, एलजेपीआर, आरएलजेपी, आरएलएम या छोट्या मोठ्या पक्षांना कसं सामावून घ्यायचं, याचंही आव्हान भाजपासमोर असणार आहे.


याशिवाय आंध्र प्रदेशमध्ये भाजपा आणि टीडीपी यांच्यातील जागावाटपाचा फॉर्म्युलासुद्धा समोर आला आहे. राज्यात लोकसभेच्या जागा असून, त्यापैकी १७ जागांवर लढण्याची तयारी केली आहे. भाजपाला ५ जागा दिल्या जाऊ शकतात. तर पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षाला ३ जागा देण्यात आल्या आहे. मात्र याबाबत अधिकृत घोषणा अद्याप होऊ शकलेली नाही. दुसरीकडे ओदिशामध्येही भाजपा आणि बीजेडी यांच्यात युती होण्याची शक्यता आहे. ओदिशामध्ये भाजपाला लोकसभेच्या अधिकाधिक जागा लढायच्या आहेत. भाजपाकडून १४ जागांवर दावा केला जात आहे. मात्र २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत येथे बीजेडीने १२ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे बीजेडी भाजपाला एवढ्या जागा सोडणार आहे का, हा प्रश्नही उपस्थित होत आहे.