Sangli Samachar

The Janshakti News

राज ठाकरेंसाठी तीन पर्याय? दोन-तीन दिवसांत चित्र होणार स्पष्टसांगली समाचार - दि. २४ मार्च २०२४
मुंबई - मनसे आणि शिवसेनेचे विलीनीकरण करून शिवसेनेचे अध्यक्षपद तुम्ही घ्या नाहीतर लोकसभेला मनसेने महायुतीला पाठिंबा द्यावा आणि विधानसभेला सन्मानजनक जागा देऊ अन्यथा लोकसभेला एकदोन जागा देऊ आणि विधानसभेला मात्र कमी जागा देऊ असे तीन पर्याय भाजप आणि शिवसेनेकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासमोर ठेवण्यात आले असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 

तीन पर्याय कोणते?

शिवसेनेसोबत विलिनीकरण - लोकसभेला पाठिंबा आणि विधानसभेत वाटा
लोकसभेला जागा, विधानसभेत कमी
राज ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी दिल्लीत अलीकडेच भेट घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ते दोनवेळा भेटले. फक्त लोकसभा निवडणुकीत मनसेला किती जागा द्यायच्या एवढाच मर्यादित विषय नव्हता, तर राज यांना महायुतीसोबत नेहमीसाठी कसे आणता येईल या दृष्टीने व्यापक चर्चा सुरू असल्याने शिंदे, फडणवीस, राज यांच्यापैकी कोणीही माध्यमांसमोर स्पष्ट सांगायला तयार नाही असे बोलले जात आहे.


शिंदे-राज एकत्रित समीकरण- शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि मनसे यांचे विलीनीकरण हा विषय दोन्हीतिन्ही बैठकांमध्ये चर्चिला गेला. त्या बाबत राज यांनी कोणताही शब्द दिला नाही. ते या प्रस्तावासाठी अनुकूल नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

- उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला शह द्यायचा असेल तर शिंदे-राज यांनी एकत्र आले पाहिजे. असे एकत्रित समीकरण ठाकरेंसाठी मोठे आव्हान उभे करू शकेल आणि त्या निमित्ताने ठाकरेंना ठाकरेंचे आव्हान उभे करता येईल, असे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने सूचित केले असल्याची माहिती आहे.

केवळ जागावाटपाची चर्चा करण्यासाठी राज ठाकरे गेले असते तर गतकाळात मनसेने वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये मिळविलेली मते किती होती याची माहिती सोबत घेतली असती. शिवाय दिल्लीला जाण्यापूर्वी आपल्या जवळच्या सहकाऱ्यांशी त्यांनी भाजप व शिंदेंकडे कोणत्या जागा मागायच्या, त्यासाठी आधार काय असेल या बाबतची चर्चा केली असती पण तसे काहीही त्यांनी केले नाही असे मनसे नेत्यांनी स्पष्ट केले. भाजप, शिवसेना किंवा मनसेच्याही नेत्यांनी या बाबत अधिकृतरित्या बोलण्यास नकार दिला. महायुतीबाबत मनसेचे नेमके काय ठरले हे दोनतीन दिवसांत स्पष्ट होण्याची शक्यता आहे.