Sangli Samachar

The Janshakti News

सांगलीच्या जागेवर काँग्रेस ठाम, बाळासाहेब थोरात म्हणाले; चर्चेतून प्रश्न मिटतील पण...



सांगली समाचार - दि. २५ मार्च २०२४
मुंबई - देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर राजकीय पक्षांची धावपळ सुरु आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीने काही लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अद्याप जाहीर केले नाहीत. काही जागांवरुन महायुतीमधील मित्रपक्षांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. तर महाविकास आघाडीतही तिच परिस्थिती आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटला नसला तरी दोन्हीकडील नेत्यांनी मात्र ठराविक जागेवरती आपला उमेदवार कोण असणार हे जाहीर केलं आहे.

अशीच एक जागा आहे सांगलीची या जागेवरुन महाविकास आघाडीत वाद सुरु आहे. एकीकडे सांगली काँग्रेसचा बाल्लेकिल्ला असल्यामुळे ती जागा आम्हाला मिळावी अशी मागणी काँग्रेसकडून केली जात आहे. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगलीतील भरसभेत डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे सांगलीतून शिवसेनेचे उमेदवार असल्याचं जाहीर केलं आहे. ठाकरेंच्या याच भूमिकेमुळे काँग्रेस विरुद्ध शिवसेना ठाकरे गट वादाला तोंड फुटलं आहे. अशातच काँग्रेसचे काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगलीच्या जागेबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.


आघाडीतील जागा वाटपाबाबतच्या प्रश्नावर उत्तर देताना थोरात म्हणाले; फक्त महाविकास आघाडीतच नव्हे तर महायुतीतही जागावाटपाचा तिढा सुरू आहे. आमच्याकडे फक्त तिढा आहे, तिकडे मात्र अनेक तिढे आहेत. आमचे सर्व तिढे सुटतील आणि आम्ही एकजुटीने काम करू. चर्चेतून प्रश्न मिटतील, पण आम्ही आजही सांगलीच्या जागेसाठी आग्रही आहोत, असं थोरातांनी सांगितलं. थोरात यांच्या वक्तव्यावरुन काँग्रेसने सांगलीच्या जागेवरचा आपला दावा कायम ठेवल्याचं पाहायला मिळत आहे. तर ठाकरेंनी चंद्रहार पाटलांना उमेदवार जाहीर करुन टाकलं आहे. त्यामुळे आता माघार नेमकं कोण घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, प्रकाश आंबेडकर आघाडीसोबत येणार का या प्रश्नावरही थोरातांनी भाष्य केलं आहे. थोरात म्हणाले, "प्रकाश आंबेडकर आघाडीतून बाहेर पडलेले नाहीत. चर्चा सुरू असून वरिष्ठ मार्ग काढतील. वंचित आघाडीत असावी अशी माझी इच्छा आहे. महाराष्ट्रात आघाडीला आणि देशात इंडिया आघाडीला अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे अपेक्षा वाढणे साहजिक आहे. या सर्वातून लवकरच मार्ग निघेल."