Sangli Samachar

The Janshakti News

प्रशिक्षणार्थी ४१ पोलीस कर्मचाऱ्यांना जेवणातून विषबाधा, ९ जण गंभीर



सांगली समाचार - दि. १२ मार्च २०२४
चंद्रपुर - सुमारे ४१ प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचाऱ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. या घटनेनंतर पोलिसांना तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान उपचारानंतर काही पोलिसांना डिस्चार्ज देण्यात आला. तर ९ पोलीस कर्मचाऱ्यांची तब्येत गंभीर असून त्यांच्या अजून उपचार सुरू आहेत.
विषबाधा कशातून झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान महाशिवरात्री निमित्ताने अनेकांनी उपवास पकडला होता. त्यात आज चमचमीत पदार्थ खाल्ल्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली असावी, असे सांगण्यात येत आहे. आज सकाळ पाळीत सुमारे ४० प्रशिक्षणार्थ्यांनी कॅन्टिनमध्ये जेवण केले. यानंतर काही प्रशिक्षणार्थ्यांना त्रास जाणवू लागला. त्यानंतर सर्व प्रशिक्षणार्थ्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

यातील ९ कर्मचाऱ्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी गंभीर दखल घेत तातडीने जेवणाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्याचे निर्देश दिले. त्यानुसार जेवणाचे नमुने घेण्यात आलेत. चंद्रपुरात उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. डी-हायड्रेशनमुळे हा प्रकार घडले असावे, असा डॉक्टरांनी अंदाज वर्तवलाय. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. सर्वसामान्यांना आज पर्यंत विषबाधा झालेल्या अनेक घटना घडलेल्या आहेत परंतु पोलिसांना अन्नातून विषबाधा झाल्याची ही घटना एकमेव असावी असे बोलले जात आहे.