Sangli Samachar

The Janshakti News

पै. चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी ११ हिंदकेसरी आणि २५ महाराष्ट्र केसरीसह पैलवानांची फौज मैदानात उतरणार





सांगली समाचार - दि. २० मार्च २०२४
सांगली - ठाकरे गटातर्फे सांगली लोकसभा मतदारसंघाच्या आखाड्यात उतरलेल्या पै. चंद्रहार पाटील यांना मातोश्री वरून 'प्रचाराला लागा' असा संदेश आल्यानंतर, त्यांच्या मित्र परिवाराने जोरदार तयारी सुरू केली आहे. उद्या मिरज येथे उद्धव ठाकरे यांच्या शिवसंवाद मेळाव्यात प्रचाराचे रणशिंग फुंकण्यात येणार आहे.

या मेळाव्याची संपूर्ण तयारी झाली असून, जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात ठाकरे गटाचे शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर देशभरातून 11 हिंदकेसरी आणि राज्यभरातून 25 महाराष्ट्र केसरी व पैलवानांची मोठी फौज पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहणार आहे.


जिल्ह्यात "ठाकरे गटाची ताकद किती ?" असा प्रश्न करून पै. चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीतील हवा काढून घेण्याचा प्रयत्न काँग्रेस कडून केला जात आहे. याला जोरदार प्रत्युत्तर देण्यासाठी ठाकरे शिवसेना व पै. पाटील यांनी शड्डू ठोकला आहे. या शिवसंवाद सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी जमवून, प्रचाराच्या शिडात हवा भरण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

दरम्यान, ७ मे २०२४ रोजी लोकसभेसाठी सांगली जिल्ह्यात मतदान होणार आहे. यासाठी काँग्रेस आणि ठाकरे गटाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. विशेषतः काँग्रेसचे जिल्ह्याचे खंबीर नेते माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी विशाल दादा पाटील यांच्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. राज्याच्या नेतृत्वानेही त्यासाठी मोठे बळ दिले जात आहे. एक-दोन दिवसात महाआघाडीकडून राज्यातील उमेदवारांची यादी जाहीर होणार असून, कोणत्याही परिस्थितीत विशाल दादा पाटील यांना उमेदवारी मिळवून द्यायचीच असा चंग सर्वांनी बांधलेला आहे. यासाठी दिल्लीच्या कोअर कमिटीकडे आग्रह धरण्यात आला आहे. विशाल पाटील यांची उमेदवारी दिल्लीतून जाहीर करण्याची खेळी राज्य व जिल्हा काँग्रेसकडून खेळण्यात येणार आहे. यासाठी गांधी व दादा घराण्याच्या निकटच्या संबंधाचे कार्ड ओपन होण्याची शक्यता आहे.

एकंदरीत भाजपच्या संजय काका पाटील यांच्या विरोधात सांगली लोकसभेसाठी काँग्रेसचे विशाल पाटील असोत वा ठाकरे गटाचे पै. चंद्रहार पाटील... येथे चुरशीच्या निवडणुकीकरिता तिरंगी लढत होणार आणि यासाठी मोठे रणकंदन माजणार हे नक्की...