Sangli Samachar

The Janshakti News

निजामुद्दीन एक्स्प्रेसला पूर्ववत दहा स्लीपर बोगी, वातानुकुलीत बोगी केल्या कमी



सांगली समाचार - दि. २७ मार्च २०२४

मिरज - गोवा निजामुद्दीन एक्स्प्रेसला पूर्ववत दहा स्लीपर बोगी जोडण्यात येणार आहेत. निजामुद्दीन एक्स्प्रेसला केवळ दोनच स्लीपर बोगी ठेवण्यात आल्याने सामान्य प्रवाशांनाही नाईलाजाने वातानुकूलीत बोगीतून प्रवासाचा भुर्दंड सोसावा लागत होता. एक्सप्रेसच्या वातानुकुलीत बोगी कमी करून स्लीपर बोगी वाढविण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.

गतवर्षी सप्टेंबर पासून गोवा निजामुद्दीन एक्स्प्रेसला अत्याधुनिक एलएचबी बोगी जोडण्यात आल्या. यासाठी २४ बोगीच्या या रेल्वेतील दहा स्लीपर बोगी पैकी दोनच शिल्लक ठेवून तेरा वातानुकूलीत बोगी जोडण्यात आल्या. केवळ दोनच स्लीपर बोगी असल्याने या गाडीतून प्रवासासाठी दोन ते अडीच हजार रुपये दराचे तिकीट घेऊन वातानुकूलीत बोगीतून प्रवास करावा लागत आहे. या गाडीत स्लीपर बोगी फक्त दोनच असल्याने सामान्य प्रवाशांना मोठा भुर्दंड बसत आहे. याकरिता या एक्स्प्रेसला पूर्ववत स्लीपरचे आरक्षित डबे जोडण्याची मागणी करण्यात आली होती.

मागणीस दक्षिण पश्चिम रेल्वे व रेल्वे बोर्डाने आता मंजुरी दिली आहे. १५ जूनपासून गोवा एक्स्प्रेसला (गाडी क्र. १२७७९) पूर्ववत दहा स्लीपरच्या आरक्षित बोगी जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे सामान्य प्रवाशांना आता वाता नुकुलीत बोगी ऐवजी साधारण स्लीपर बोगीतून प्रवास करता येणार असल्याने निम्म्या खर्चात प्रवास करता येणार आहे.