सांगली समाचार - दि. १८ मार्च २०२४
मुंबई - मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मागील अनेक दिवसांपासून मनोज जरांगे आंदोलन करत आहे. काही दिवसांपूर्वी जरांगे यांनी राजकीय नेत्यांना गाव बंदी घालण्याचा निर्णय घेला होता. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातील मराठा समाजाने देखील आता असाच काही निर्णय घेतला आहे. प्रत्येक गावात आता राजकीय नेत्यांना दार बंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत मराठा समाजाच्या वतीने पत्रकार परिषद
घेऊन माहिती देण्यात आली आहे. मराठा आरक्षणाबाबत सगेसोयऱ्या कायद्याची अमलबजावणी करण्याचा निर्णय सरकारने लोकसभा आचारसंहितेपूर्वी न घेतल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. यापूर्वी राजकीय नेत्यांना गावबंदी होती, मात्र या निवडणुकीत सर्व उमेदवारांना आता दार बंदी केली जाणार असुन कोणत्याही
उमेदवारांना दारात फिरकू दिले जाणार नाही असा निर्णय धाराशिव येथे मराठा समाजाने पत्रकार परिषद घेऊन जाहीर केला आहे. लोकसभा निवडणुकीत निवडून येणे हा आमचा उद्देश नसून, केवळ सरकारी यंत्रणेला जेरीस आणण्यासाठी मराठा समाज प्रत्येक गावातून उमेदवार उभे करणार आहे. संपुर्ण जिल्ह्यातून १००० उमेदवार देणार असण्याची घोषणाही या पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे. उभे उभं
मराठा समाजाच्या वतीने आज धाराशिवमध्ये बैठक घेण्यात आली. या बैठकीत सर्वांमते काही निर्णय घेण्यात आले. ज्यात लोकसभा निवडणुकीत प्रत्येक गावातून दोन मराठा उमेदवार करण्याचा निर्णय झाला आहे. जिल्हाभरातून अंदाजे १००० उमेदवार करून सरकारी यंत्रणेला जेरीस आणायचं आहे. कोणत्याही पक्षाने काहीच न केल्याने आता आमचा त्यांना विरोध राहिला नाही. त्यामुळे आता शासकीय यंत्रणेला जेरीस आणण्याचा आमचा उद्देश आहे. तसेच आम्ही गाव बंदीबाबत कोणताही निर्णय घेतला नसून, यापुढे घर बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोणत्याही नेत्याने किंवा पुढाऱ्याने आमच्या घरासमोर येऊ नाही. तरीही आमच्या घरासमोर आल्यास त्यांना त्याचा प्रसाद मिळून जाईल, असा इशारा मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी सगेसोयरे कायद्याची अमलबजावणी करण्याची मागणी मनोज जरांगे यांच्याकडून केली जात आहे. यासाठी ते राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्याचा दौरा करत आहेत. दरम्यान, मागील दोन दिवसांत त्यांनी बीड जिल्ह्याचा दौरा करत बैठका आणि सभा घेतल्या. मात्र, पोलिसांकडून दोन दिवसांत जरांगे पालिसाकडून यांच्याविरोधात पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांची नोटीस न स्वीकारणे, प्रक्षोभक भाषण करणे तसेच खोटी माहिती प्रसारित केल्याचा आरोप करत जरांगे यांच्यावर हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. असे असलं तरीही आपण आपल्या मागणीवर ठाम असल्याचे जरांगे म्हणाले आहेत.