Sangli Samachar

The Janshakti News

नरेंद्र मोदींविरोधात काँग्रेस निवडणूक आयोगात धाव घेणार! पृथ्वीराज चव्हाणसांगली समाचार - दि. ७ मार्च २०२४
मुंबई  - लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठकांचे सत्र सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. काही पक्षांनी उमेदवार यादी जाहीर केली आहे. तरी अद्यापही अनेक जागांवर उमेदवारांच्या निवडीबाबत चर्चा सुरू आहेत. देशात इंडिया आघाडी आणि राज्यात महाविकास आघाडीची जागावाटपावरून वाटाघाटी सुरू असल्याचे दिसत आहे. यातच प्रचार, दौरे यांचेही प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. यातच काँग्रेस नरेंद्र मोदींविरोधात केंद्रीय निवडणूक आयोगात धाव घेणार असल्याचे म्हटले जात आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना केंद्र सरकारच्या जाहिरातींबाबत आक्षेप नोंदवला. भाजप आणि मनुवादी व्यवस्थेच्या विरोधात एकत्र आलो असून महाराष्ट्रात विजयाची खात्री नसल्यानेच त्यांच्याकडून फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. त्यामुळे तीन पक्षांच्या बैठकीत उमेदवार ठरेल त्याला विजयी करणार आहे. यासाठी योग्यवेळी जागांची आणि उमेदवारांचीही घोषणा होईल, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. 


आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदवणार !

सध्या देशभरात "मोदी की गॅरंटी" अशी केंद्रातून जाहिरात सुरू आहे. ही जाहिरात केंद्र सरकारच्या नावाने केली तर आपण समजू शकतो. मात्र, नरेंद्र मोदी एक उमेदवार आहेत. त्यांचा प्रचार सरकारी पैशाने करणे हे योग्य नाही. याविषयी आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदवणार आहोत. याविषयी कारवाई होईल का नाही माहिती नाही, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. 

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपने ३७० पार खासदाराचा नारा दिला आहे. याचा अर्थ संविधान बदलण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर लोकशाही संपुष्टात आणून विरोधी पक्षांनाही संपविण्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्रात तर मराठा समाज आणि ओबीसीत भांडणे लावली आहेत. हे सर्व मनुवादी कारस्थान आहे. या निवडणुकीत विजयाची खात्री नसल्यानेच त्यांच्याकडून पक्ष फोडण्याचे काम सुरू आहे. देशातील लोकशाही आणि संविधान टिकवण्यासाठी लोकांनीच ही निवडणूक हाती घेण्याची गरज आहे. त्याचबरोबर या निवडणुकीत वंचित आघाडीलाही बरोबर घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे चव्हाण यांनी म्हटले आहे.