Sangli Samachar

The Janshakti News

आरक्षणासाठी आता धनगर समाज आक्रमक; लोकसभा निवडणुकीबाबत केली मोठी घोषणासांगली समाचार - दि. १० मार्च २०२४
जालना - राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. राज्य सरकारनं मराठा समाजाला विशेष अधिवेशन घेऊन दहा टक्के आरक्षण मंजूर केलं. मात्र आम्हाला ते आरक्षण नको तर ओबीसीमधून आरक्षण द्या या भूमिकेवर अजूनही मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. सरकारने सगेसोयरे शब्दाची अंमलबजावणी करावी यासाठी त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. यासाठीच आता येत्या लोकसभा निवडणुकीत मराठा समाज प्रत्येक गावातून निवडणुकीच्या उमेदवारीचे अर्ज भरणार आहे. दरम्यान दुसरीकडे मराठा समाजाच्या या निर्णयानंतर आता धनगर समाजाकडून देखील मोठी घोषणा करण्यात आली आहे.


धनगर समाजही आता लोकसभेच्या प्रत्येक मतदारसंघातून उमेदवार उभा करणार आहे. जालन्यातील धनगर समाजाचे नेते दीपक बोऱ्हाडे यांनी याबाबत माहिती दिली आहे. 'मागच्या अनेक वर्षांपासून धनगर समाज घटनात्मक आरक्षणाची मागणी करत आहे. मात्र राजकीय पक्षांनी धनगर समाजाची दुहेरी फसवणूक केली आहे. राज्यात तीन कोटी धनगर समाज आहे. मात्र त्यात एकही संसदेत खासदार नाहीये. त्यामुळं आता प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून धनगर समाज उमेदवार देणार असल्याचं' दीपक बोऱ्हाडे यांनी म्हंटलंय. तर जालन्यातून रावसाहेब दानवे यांच्याविरोधात आपण स्वत: उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

दरम्यान मराठा समाजानंतर आता धनगर समाज देखील आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. मराठा समाज प्रत्येक गावामधून लोकसभेसाठी उमेदवार उभा करणार आहे, तर धनगर समाजही लोकसभेसाठी प्रत्येक मतदारसंघातून आपला एक उमेदवार देणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये मोठी चूरस निर्माण होण्याची शक्यता आहे.