Sangli Samachar

The Janshakti News

सातारा-पुणे, पुणे-नाशिक महामार्गावर "टोल धाड"



सांगली समाचार - दि. ३१ मार्च २०२४
पुणे  - पुणे-सातारा आणि पुणे-नाशिक प्रवास महागणार असून १ एप्रिलपासून टोल दरात वाढ होणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) कडून टोल दरवाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे या रस्त्यांवरील प्रवास महागणार आहे. एक एप्रिलपासून या दोन महामार्गावर साधारण अडीच टक्क्यांनी टोलमध्ये वाढ होणार आहे.


पुणे-सातारा मार्गावरील खेड शिवापूर आणि आणेवाडी येथील टोल नाक्यांवर मोटार, जीप व हलक्या वाहनांना पूर्वी ११५ रुपये टोल आकारला जात होता. त्यामध्ये पाच रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. एक एप्रिलपासून या टोल नाक्यांवर हलक्या वाहनांसाठी १२० रुपये टोलसाठी मोजावे लागतील. खेड शिवापूर टोल नाक्यावर बस आणि ट्रकसाठी ३९० रुपये दर होता. नवीन निर्णयानुसार या वाहनांना आता चारशे रुपये मोजावे लागणार आहेत. अवजड वाहनांसाठी खेड शिवापूर टोल नाक्यावर ६१५ रुपये टोल आकारला जात होता. आता त्यात १५ रुपयांनी वाढ झाली असून, त्या वाहनांना ६३० रुपये टोल भरावा लागणार आहे.