Sangli Samachar

The Janshakti News

मुख्यमंत्री शिंदेंना चक्क अजितदादांचा विसर; म्हणाले, "डबल इंजिन..."सांगली समाचार - दि. १० मार्च २०२४
पाटण  - राज्यात महाविकास आघाडीचे सरकार जाऊन शिंदे-फडणवीस यांचे डबल इंजिन सरकार दोन वर्षांपूर्वी स्थापन झाले. त्यानंतर गेल्या 7-8 महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडून अजित पवार गट महायुतीत सहभागी झाला. यामुळे शिंदे-फडणवीस आणि पवार असे ट्रिपल इंजिन सरकार राज्याचा विकास प्रगतिपथावर नेईल, अशा घोषणा दिल्या गेल्या. आता आगामी लोकसभेच्या तोंडावर साताऱ्यातील जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे डबल इंजिन सरकार राज्याचा विकास करत असल्याचे म्हणाले. त्यामुळे ट्रिपल इंजिन सरकारमधील अजित पवार यांच्या एका इंजिनला मुख्यमंत्री विसरले. 
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या जिल्ह्यात गाळमुक्त धरण आणि गाळमुक्त शिवार यांचा शुभारंभ करण्यात आला. या योजनेमुळे कोयना धरणातील 10 टीएमसी पाणीसाठा वाढणार आहे. रेशीम गाव प्रकल्प, बांबू उत्पादन यांच्यासह देशातील सर्वात मोठा जल क्रीडा-प्रकल्प सुरू करण्यात आला. पाटण तालुक्यातील दरडग्रस्ताचं कायमस्वरूपी पुनर्वसन, मल्हारपेठ पोलिस ठाण्याचा आणि रहिवाशी सदनिकाचे उद्घाटन करण्यात आले. पाटण तालुक्यातही जल क्रीडा प्रकल्प होणार असून, त्यासाठी 70 कोटी मंजूर केले आहेत. तसेच भूस्खलन झाले तेव्हा मिरगावला मी आलो होतो. एमएमआरडी मुंबईसाठी असली तरी पाटण तालुक्यातील भूमिपुत्रासाठी 160 कोटी रुपये मंजूर केले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 


या कार्यक्रमाला मदत व पुनर्वसनमंत्री उदय सामंत, पालकमंत्री शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान उपस्थित कार्यक्रमात खाली बसलेल्या एका महिलेला कडक उन्हामुळे ग्लानी आली होती. तत्काळ मुख्यमंत्री यांनी भाषण थांबवून त्या महिलेला पंख्याखाली बसविण्याची सूचना आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना केली. त्यांच्या या समयसूचकतेची दखल आरोग्य विभागाने घेतली. 

डबल इंजिन सरकार -

मुख्यमंत्री यांनी विकासकामे सांगताना तसेच केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासकामांना केलेल्या सहकार्यासाठी आभार मानले. तेव्हा दोन ते तीन वेळा डबल इंजिन सरकार सांगितले. त्यामुळे ट्रिपल इंजिन असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार  यांना मुख्यमंत्री विसरल्याचे पाहायला मिळाले. कारण राज्यात शिंदे- फडणवीस- पवार असे ट्रिपल इंजिन सरकार म्हणून घोषणा दिली जात होती. परंतु, डबल इंजिन-डबल इंजिन म्हटल्यामुळे संभ्रम निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.