सांगली समाचार - दि. १७ मार्च २०२४
नवी दिल्ली - निवडणूक आयोगाने शनिवारी (16 मार्च) लोकसभा निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर केलं. 19 एप्रिलला मतदानाचा पहिला टप्पा सुरू होणार आहे. कित्येक मतदारसंघांमध्ये उमेदवार देखील निश्चित झाले आहेत. अशात मतदारांना आपल्या उमेदवाराची संपूर्ण माहिती असावी या उद्देशाने निवडणूक आयोगाने एक खास अॅप लाँच केलं आहे. नो युवर कँडिडेट (KYC) असं या अॅपचं नाव आहे. यामध्ये प्रत्येक उमेदवाराचं बॅकग्राउंड, त्याची संपत्ती आणि इतर माहिती दिलेली आहे. या उमेदवाराचं क्रिमिनल बॅकग्राउंड आहे की नाही, त्याच्यावर किती केसेस किंवा तक्रारी दाखल आहेत याबाबत देखील या अॅपमध्ये सांगितलं आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी याबाबत माहिती दिली. आपल्या मतदारसंघातून आपलं प्रतिनिधित्व करणाऱ्या उमेदवाराबाबत माहिती करून घेणं हा मतदारांचा हक्क आहे. या उमेदवाराला काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का, त्याची संपत्ती किती आहे, त्याच्याकडे किती पैसे आहेत ही माहिती मतदार आता केवळ एका क्लिकवर मिळवू शकणार आहेत.
राजकीय पक्षांनी देखील क्रिमिनल बॅकग्राउंड असणाऱ्या उमेदवाराची घोषणा करताना त्यामागे काय विचार होता हे स्पष्ट करायला हवं. इतर उमेदवारांऐवजी गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या उमेदवारांची निवड का केली गेली हे पक्षांनी सांगावं, असं CEC म्हणाले. तसंच उमेदवारांनी देखील आपली क्रिमिनल हिस्ट्री स्वतःच डिस्क्लोज करावी असंही निवडणूक आयोगाने सांगितलं आहे. "उमेदवारांनी आपली गुन्हेगारी पार्श्वभूमी वृत्तपत्रे आणि टीव्ही चॅनलवरुन तीन वेळा प्रसिद्ध करावी" असं कुमार यांनी सांगितलं.
KYC अॅप
हे अॅप गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल अॅप स्टोअरवर उपलब्ध आहे. यामध्ये मतदार आपल्या उमेदवारांचं नाव टाकून त्यांना सर्च करू शकता.