सांगली समाचार - दि. २७ मार्च २०२४
नवी दिल्ली - मागील संपूर्ण आठवडा विविध माध्यमातून महिलांच्या कार्य कर्तुत्वाचा गौरव करीत काल 8 मार्च रोजी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणा-या महिलांच्या सन्मानार्थ तसेच त्यांच्या अस्तित्वाला बळ देण्यासाठी “ जागतिक महिला दिन” म्हणून साजरा केला गेला. ‘जागतिक महिला दिना’च्या निमित्ताने वर्तमानपत्र, सोशल मिडियांचे रकाने महिलांच्या गुणगौरवाने भरलेले होते. देशभरात त्यानिमित्ताने अनेक कार्यक्रम साजरे करण्यात आले. त्यात महिलांना शुभेच्छा देत अनेक पुरस्कार दिले व घेतले गेले.
यासर्व पुरस्कार समारोहात वेगळा आणि त्याची दखल विविध वर्तमानपत्रांनी घ्यावी असा समारोह म्हणजे बेंगळुरू येथे संपन्न झालेला ‘वेमपावर’. या समारोहात “बेस्ट माॅम ऑफ द वर्ल्ड” हा खिताब जाहीर करण्यात आला तो एका पुरुषाला. बेस्ट माॅम म्हटले की, ह्या पुरस्काराची मानकरी महिलाचं असेल असे वाटत असतांनाच तो एका पुरुषाला म्हणजेच पुणे शहरातील आदित्य तिवारी यांना जाहीर झाला.
आदित्य तिवारी हे सिंगल पॅरेंट असून 2016 मध्ये 22 महिन्याच्या अवनिशला त्यानी दत्तक घेतले. मुल दत्तक घेतांना कोणताही पालक सुदृढ बाळाची निवड करेल, पण आदित्य यांनी चक्क डाऊन सिंड्रोम असलेल्या मुलाची निवड केली. डाऊन सिंड्रोम हा मुलांमध्ये मतिमंदत्व आणणारा आजार असतो. हा आजार असलेल्या मुलांना काळजीपूर्वक जपावं लागतं. अशा मुलाला एक सिंगल पॅरेंट म्हणून मोठा कायदेशीर आणि सामाजिक लढा आदित्यला द्यावा लागला व शेवटी त्याची ममता जिंकली.
साधारण दीड वर्षाच्या संघर्षानंतर 1 जाने. 2016 रोजी आईने अनाथालयात सोडलेल्या अवनिशला आदित्यला घरी आणता आले. दत्तक कायदा व समाजाप्रमाणे त्याला घरातूनही विरोध झालाच. परंतू अवनिशला आईची कमतरता न भासू देणा-या आदित्यमधील ममता यासर्व विरोधांना बाळगणारी नव्हती.
आदित्य तिवारी एका सुप्रसिद्ध आयटी कंपनीत साॅफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत होता. परंतू अवनिशचे पालकत्व स्विकारल्यानंतर त्याच्या काळजीपोटी त्याने नोकरीवर पाणी सोडत ‘स्पेशल’ मुलांच्या आई-वडिलांना मार्गदर्शन, समुपदेशन व त्यांना प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. हे करत असतांना त्याला लक्षात आलं की, भारतात बौद्धिक अपंगत्वासाठी वेगळा विभागाचं नाही. सरकार अशा मुलांना अपंगत्वाचं प्रमाणपत्रही देत नाही. करीता आदित्याने ऑनलाईन याचिका दाखल केली. परिणामी आज सरकारकडून स्पेशल मुलांसाठी वेगळा विभाग तयार करण्यात आला असून अशा मुलांसाठी प्रमाणपत्रही देण्यात यायला लागली आहेत.
‘सिंगल पॅरेटिंग’ हे काही लिंग आधारित काम नाहीच असे म्हणणारा आदित्य त्याच्या या प्रवासाबद्दल, “ईश्वराने दिलेल्या भेटीमध्ये तो माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ भेट आहे. यासाठी मी स्वत:ला भाग्यशाली समजतो.” असा सहज साक्षात्कारात बोलून जातो. आदित्याने स्वत:ला कधीच कोणत्याही भूमिकेत टाकण्याचा प्रयत्न केला नाही… ना आई, ना बाबा… तो नेहमीच एक चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करीत होता. एक चांगला पालक कसे बनायचं हे अवनिशने ‘एक पालक’ म्हणून आदित्याचा स्वीकार करीत शिकवलं.
आजपर्यंत आदित्य आणि अवनिश यांनी मिळून 22 राज्यांची सफर केली असून जवळजवळ 400 ठिकाणी कार्यक्रम व कार्यशाळा घेतल्या आहेत. याखेरीज ते जगभरातील दहा हजारांहून अधिक पालकांशी जोडले गेले आहेत. मानसिकरीत्या असमर्थ असणा-या मुलांचा सांभाळ करण्याच्या पध्दतीबद्दल बोलण्यासाठी आदित्यला संयुक्त राष्ट्राच्या एका संमेलनात विशेष आमंत्रित करण्यात आले होते. केवळ एक महिलाच बाळाचा सांभाळ करु शकते अशी आपल्याकडे मान्यता असतांना आपल्या ‘स्पेशल’ मुलाचा आदित्याने, एका सिंगल पॅरेंटने काळजी घेतली आणि म्हणूनच आदित्य तिवारींच्या या कर्तुत्वाची दखल घेत नुकत्याच पार पडलेल्या बेंगळुरु येथील वेमपावर या ‘जागतिक महिला दिना’च्या समारोहात “जगातील सर्वश्रेष्ठ आई” या खिताबानं एका पुरुषाला गौरविले.