Sangli Samachar

The Janshakti News

विशाल दादांना चाल की पै. चंद्रहार पाटील यांचा धोबीपछाडचा डाव



सांगली समाचार - दि. २१ मार्च २०२४
सांगली - राज्यातील महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा घोळ अंतिम टप्प्यावर आलेला असताना, सांगलीत मात्र ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये तू- तू... मैं- मैं... सुरूच आहे...

डॉ. विश्वजीत कदम, आ. विक्रमसिंह सावंत, पृथ्वीराज पाटील, जयश्रीताई पाटील यांनी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नानासाहेब पटोळे यांच्या माध्यमातून केंद्रीय कोअर कमिटी मध्ये आपले वजन वापरून विशाल दादांची उमेदवारी फायनल केलेली असतानाही ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी सांगलीची जागा प्रतिष्ठेची केलेली आहे. परिणामी सांगलीत ठाकरे गट व काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडलेले आहेत. याचे पडसाद आजच्या उद्धव ठाकरे यांच्या मिरजेतील जाहीर सभेवर उमटताना दिसत आहेत.

उद्धव ठाकरे सांगलीत आल्यानंतर स्व. वसंतदादांच्या समाधीवर जाऊन दर्शन घेणार असल्याची बातमी सर्वत्र प्रसिद्ध झाली. या माध्यमातून काँग्रेसला चुचकारता येते का ?... पै. चंद्रहार पाटील यांच्था उमेदवारीवर शिक्कामोर्तब करता येते का ? याचा अंदाज घेण्यात आला. परंतु काँग्रेसने या जागेवरील आपला हक्क सोडण्यास ठाम नकार दिला आहे. आता चेंडू उद्योग ठाकरे यांच्या कोर्टात असून संध्याकाळी जाहीर सभेतून ते काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे...


या पार्श्वभूमीवर काल पै. चंद्रहार पाटील यांनी एक डाव टाकला... महाविकास आघाडी कडून विशाल दादांना उमेदवारी जाहीर झाली तर मी हा प्रश्न प्रतिष्ठेचा न करता एक शिवसैनिक म्हणून दादांचा प्रचार करेन... पण जर शिवसेनेला ही जागा काँग्रेसने सोडली तर दादांनी मोठ्या मनाने माझ्या पाठीशी उभे राहावे, असे प्रतिपादन पै. चंद्रहार पाटील यांनी केले. याचाच अर्थ पै. चंद्रहार पाटलांनी विशाल पाटील यांना पुढे चाल दिली की यामध्ये धोबीपछाडचा डाव आहे अशी चर्चा मतदार संघात रंगलेली आहे...