Sangli Samachar

The Janshakti News

सांगलीची जागा शिवसेनेसाठी सोडण्याची मागणीसांगली समाचार - दि. ५ मार्च २०२४
सांगली - महाविकास आघाडीतर्फे लोकसभा निवडणूक एकत्रित लढवण्यात येणार आहे. कोल्हापूरची जागा शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वाट्याला आहे. त्यातील एक जागा काँग्रेसला देण्याचे नियोजन सुरू आहे. कोल्हापूरची जागा काँग्रेसला दिल्यास सांगलीची जागा शिवसेनेला देण्यात यावी. महाविकास आघाडीतर्फे सामान्य कार्यकर्ताही निवडून येईल, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केली.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथे शिवसेना ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख नितीन बानुगडे-पाटील, एम. आर. ठाकरे, जिल्हाप्रमुख संजय विभुते, जिल्हा संघटक दिगंबर जाधव, बजरंग पाटील आर्दीच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी बानुगडे-पाटील यांनी शिवसेनेमध्ये जिल्हा संघटक दिगंबर जाधव, बजरंग पाटील हे आमच्याकडे लोकसभेचे सक्षम उमेदवार आहेत. ते निवडणुकीत निवडून येऊ शकतात, असे सांगितले.


दिगंबर जाधव म्हणाले, राज्यात महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत लोकांच्यात सहानुभूती आहे. मिरज विधानसभा मतदारसंघात वीस वर्षांपूर्वी शिवसेनेचा निसटता पराभव झाला होता. आम्ही जिल्हा मध्यवर्ती बँक, सांगली बाजार समिती या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीला मदत केली आहे. आता लोकसभेला पश्चिम महाराष्ट्रातून शिवसेनेला किमान एक तरी जागा मिळायला हवी. सांगली लोकसभा मतदारसंघ शिवसेनेला देण्याबाबत चर्चा सुरू आहे. त्यांनी मला संधी दिली तर मी निवडणूक लढवण्यासाठी तयार आहे. निवडणुकीत सामान्य कार्यकर्त्यांना संधी मिळायला हवी. पक्ष वाढीसाठी लोकसभा निवडणूक पक्षातर्फे लढवणे आवश्यक आहे. पक्षाने मला उमेदवारी द्यावी, अशी मागणी मी पक्षाकडे केली आहे, असेही त्यांनी सांगितले.