Sangli Samachar

The Janshakti News

तिन्ही नेत्यांची पुन्हा दिल्ली वारी; बैठकीची तारीख ठरली, जागावाटपाचा तिढा सुटणार का ?



सांगली समाचार - दि. १० मार्च २०२४
मुंबई  - लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपावरून महाराष्ट्रात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांच्या महायुतीमध्ये मोठी चढाओढ सुरू असल्याचं चित्र आहे. जागावाटपाचा तिढा सुटत नसल्याने काल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीला रवाना झाले होते. नवी दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि भाजप नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली. मात्र या बैठकीनंतरही महायुतीत जागावाटपावरून एकमत झालं नसल्याची माहिती आहे. त्यामुळे ११ मार्च रोजी पुन्हा एकदा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीला जाणार असल्याचे समजते.

शिवसेनेत उद्धव ठाकरे यांना आव्हान देत एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीत शरद पवार यांना आव्हान देत अजित पवार हे भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले. दोन्ही नेत्यांना भाजपने राज्यातील सत्तेत महत्त्वाचा वाटा दिला. मात्र आता लोकसभा निवडणुकीत आम्हाला झुकतं माप हवं, अशी भूमिका भाजप नेत्यांनी घेतली आहे. त्यामुळे भाजपकडून ३० पेक्षा अधिक जागा लढण्याचा आग्रह केला जात आहे. परिणामी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला कमी जागांवर समाधान मानावं लागण्याची शक्यता आहे. मात्र हे दोन्ही नेते कोणत्याही स्थितीत कमी जागा स्वीकारण्यास तयार नाहीत. त्यामुळेच महायुतीत जागावाटपाचा तिढा निर्माण झाला आहे. आता ११ मार्च रोजी दिल्ली होणाऱ्या बैठकीत तरी हा तिढा सुटणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.


कोणता पक्ष किती जागा लढण्याची शक्यता?

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील ४८ पैकी ३० हून अधिक जागा भाजप लढवणार आहे, तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला १० आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ६ ते ८ जागा मिळण्याची शक्यता आहे. दक्षिण मुंबईची जागा शिवसेना भाजपला सोडण्यास तयार असल्याचे समजते. एनडीएने महाराष्ट्रात ४५ पेक्षा अधिक जागा जिंकण्याचं टार्गेट ठेवलं आहे.