Sangli Samachar

The Janshakti News

महाराष्ट्रातील राजकारणाला नवं वळण; जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय ?



सांगली समाचार - दि. ३० मार्च २०२४
जालना - मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव जालन्यातील सकल मराठा समाजाच्या बैठकीत मांडण्यात आला, यावर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातून निवडणूक लढवावी, अशी मागणी या बैठकीत एकमुखाने केली गेली. तसंच चळवळीत काम करणाऱ्यांना उमेदवारी देण्याचा ठरावही केला गेला. जालन्यामध्ये सकल मराठा समाजाची बैठक पार पडली.

मराठा समाजाच्या या बैठकीला जालन्यातील मराठा आंदोलक पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला. जिल्ह्यात जर मराठा समाजाचा उमेदवार उभा केला तर त्याला पाठिंबा द्यायचा. चळवळीत काम करणाऱ्याला उमेदवारी द्यायची, नाहीतर संभाजीनगरमध्ये झालेल्या राड्यासारखे वाद होतील, त्यामुळे जरांगे पाटील यांनी जालना लोकसभा निवडणूक लढवावी, असा एकमुखी ठराव या बैठकीत केला गेला.


मनोज जरांगेंची प्रतिक्रिया

दरम्यान जालन्यातून निवडणूक लढण्याच्या या प्रस्तावावर मनोज जरांगे पाटील यांनी संदिग्ध  प्रतिक्रिया दिली आहे. लोकसभेला उमेदवार द्यायचा का नाही किंवा स्वत:हून निवडणूक लढवायची का ? याचा उद्या गावागावातून अहवाल येईल, त्यानंतर पत्रकार परिषदेत जाहीर करेन, असं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

मराठा बैठकीत राडा

संभाजी नगरमधल्या मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी झाल्याचा प्रकार घडला आहे, त्यावरही जरांगे बोलले आहेत. मराठा समाज मोठा आहे, आमचं कुटुंब मोठं आहे, त्यामुळे भांडण वाद होत असतात. त्याला सिरियस घ्यायची आवश्यकता नाही. संभाजीनगरमध्ये काय झालं मला माहिती नाही, पण दोघांनाही बोलवून समजावून सांगितलं जाईल. आंदोलनात कधीच फूट पडू शकत नाही, असं जरांगे पाटील म्हणाले आहेत.