Sangli Samachar

The Janshakti News

महाराष्ट्रात भाजप - काँग्रेसमध्ये 'काँटे की टक्कर'; 'या' 5 मतदारसंघात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागणारसांगली समाचार- दि. २४ मार्च २०२४
मुंबई - लोकसभा निवडणुकांची घोषणा होताच राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. लोकसभा निवडणुकीसाठी मित्र पक्षांना बाजूला ठेवत भाजपने 20 तर काँग्रेस पक्षाने 11 उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये अनेक दिग्गजांचे तिकीट कापून काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. दोन्ही पक्षांनी आतापर्यंत जाहीर केलेल्या जागांवरुन काँग्रेस आणि भाजपच्या पाच उमेदवारांमध्ये थेट लढत होणार आहे. यामध्ये अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली असून या लढती तुल्यबळ होणार एकतर्फी याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

भाजप उमेदवारांची यादी

नंदुरबार - हीना गावित
धुळे - सुभाष भामरे
जळगाव - स्मिता वाघ
रावेर - रक्षा खडसे
अकोला - अनुप धोत्रे
वर्धा - रामदास तडस
नागपूर - नितीन गडकरी
चंद्रपूर - सुधीर मुनगंटीवार
नांदेड - प्रताप पाटील चिखलीकर
जालना - रावसाहेब दानवे
दिंडोरी - भारती पवार
भिवंडी - कपिल पाटील
उत्तर मुंबई - पियुष गोयल
उत्तर पूर्व (ईशान्य) मुंबई - मिहिर कोटेचा
पुणे - मुरलीधर मोहोळ
बीड - पंकजा मुंडे
लातूर - सुधाकर श्रृंगारे
माढा - रणजीत नाईक निंबाळकर
सांगली - संजयकाका पाटील
अहमदनगर - सुजय विखे

काँग्रेस उमेदवारांची यादी

सोलापूर - प्रणिती शिंदे
कोल्हापूर - शाहू महाराज छत्रपती
पुणे - रवींद्र धंगेकर
नंदुरबार - गोवाल पाडवी
अमरावती - वळवंत वानखेडे
लातूर - डॉ. शिवाजी काळगे
नांदेड - वसंतराव चव्हाण
नागपूर - विकास ठाकरे
रामटेक - रश्मी बर्वे
भंडारा-गोंदिया - डॉ. प्रशांत पडोळे
गडचिरोली- चिमूर - डॉ. नामदेव किरसान


हिना गावित - गोवाल पाडवी (नंदुरबार)

नंदुरबार लोकसभा निवडणुकीत भाजपच्या हिना गावित यांची लढत काँग्रेसच्या माजी मंत्री के सी पाडवी यांचे पुत्र गोवाल पाडवी यांच्यासोबत होणार आहे. त्यामुळे नंदुरबारमध्ये आता वकील विरुद्ध डॉक्टर असा सामना होणार असल्याची चर्चा सुरु आहेत. गोवाल पाडवी हे वकील तर हिना गावित या डॉक्टर आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत केसी पाडवी यांना हिना गावित यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे गोवाल पाडवी हे वडिलांच्या पराभवाचा वचपा काढणार का? याकडे नंदुरबारवासियांचे लक्ष लागलं आहे.

नितीन गडकरी-विकास ठाकरे (नागपूर)

भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्या विरोधात पक्षाने विकास ठाकरे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे नागपुरात गडकरी विरुद्ध ठाकरे अशी लढत होणार आहे. विकास ठाकरे हे नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. उमेदवारीची घोषणा होताच विकास ठाकरे यांनी गडकरींवर टीका केली आहे. नितीन गडकरी म्हणतात की त्यांनी नागपूर शहराचा विकास केला. मग त्यांच्या आधी हा विकास कधी झाला नव्हता का? असा सवाल ठाकरेंनी केला आहे. नितीन गडकरी यांच्यामुळे भाजपसाठी ही जागा प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे नागपूरच्या जागेवर नेमका कोणाचा विजय होणार आहे? याकडे राज्यासह देशाचं लक्ष असणार आहे.

प्रताप पाटील चिखलीकर-वसंतराव चव्हाण (नांदेड)

काँग्रेसने नांदेड लोकसभा मतदारसंघातून खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्याविरोधात वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली आहे. अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर नांदेडमधील बरीच राजकीय समीकरणे बदलली असून एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले एकत्र आल्याने या लढतीकडे अनेकांचे लक्ष लागलं आहे. पूर्वी एकमेकांविरोधात लढलो पण आता एकदिलाने काम करा असा संदेश समर्थकांना अशोक चव्हाण यांनी दिला आहे. तर जिल्ह्यात अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वातच कामं होतील असा स्पष्ट संदेश चिखलीकर यांनी दिला आहे. दुसरीकडे अनेक वर्षे वसंतराव चव्हाण यांच्यासोबत काम केलेल्या अशोक चव्हाणांना त्यांच्याविरोधातील चिखलीकरांना निवडणून आणावं लागणार आहे.

मुरलीधर मोहोळ-रवींद्र धंगेकर (पुणे)

पुण्यात भाजपकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ पुणे लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. तर त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर हे मैदानात उतरले आहेत. धंगेकर यांना उमेदवारी मिळताच काँग्रेस नेते आबा बागुल यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांना निवडणुकीत काँग्रेससमर्थकांकडून नाराजीचा सामना करावा लागू शकतो.

सुधाकर शृंगारे- डॉ. शिवाजी काळगे (लातूर)

लातूर लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव मतदारसंघ आहे. लातूरमध्ये भाजपकडून खासदार सुधाकर शृंगारे यांना संधी देण्यात आली आहे. तर काँग्रेसने इथे नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे. काँग्रेसकडून डॉ. शिवाजी काळगे हे निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेस पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे तो पात्र ठरवण्याचा पूर्ण प्रयत्न मी करेन, असे डॉ. शिवाजी काळगे यांनी म्हटलं आहे.