Sangli Samachar

The Janshakti News

'वंदे भारत ट्रेन'ने 250 जिल्ह्यांना जोडले; 85,000 कोटींच्या रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन-पायाभरणीसांगली समाचार - दि. १३ मार्च २०२४
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील विविध भागांचे दौरे करुन अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करत आहेत. आज(दि.12) पीएम मोदी गुजरातच्या दौऱ्यावर असून, त्यांनी साबरमती येथून 1 लाख कोटी रुपयांहूनन अधिक किमतीच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यासोबतच, 10 नवीन वंदे भारत गाड्यांचे लोकार्पणदेखील करण्यात आले. यांसह देशभरातील 250 जिल्हे वंदे भारत ट्रेनने जोडले जाणार आहेत.

पंतप्रधानांनी येथील 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर (DFC) ऑपरेशन्स कंट्रोल सेंटर'ला भेट दिल्यानंतर गुजरातमधील अहमदाबादच्या साबरमती परिसरातून या प्रकल्पांचा शुभारंभ केला. यावेळी बोलताना पीएम मोदी म्हणाले की, भारताचा सतत्याने विकास होतोय. आज देशाच्या कानाकोपऱ्यात विविध प्रकल्पांचे उद्घाटन-पायाभरणी होत आहे. मी फक्त 2024 सालाबद्दल बोललो, तर या 75 दिवसात 11 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी झाली आहे. गेल्या 10-12 दिवसांत 7 लाख कोटींहून अधिक किमतीच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी झाली. आजही या कार्यक्रमात 1 लाख कोटींहून अधिक किमतीच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात आली आहे. त्यापैकी 85 हजार कोटी रुपयांहून अधिक किमतीचे रेल्वे प्रकल्प देशाला मिळाले.


पंतप्रधानांनी रेल्वे कार्यशाळा, लोको शेड, पिट लाईन/कोचिंग डेपो, फलटण - बारामती नवीन लाईन आणि इलेक्ट्रिक ट्रॅक्शन सिस्टम अपग्रेडेशन कामाची, ईस्टर्न डीएफसीच्या न्यू खुर्जा ते साहनेवाल (401 मार्ग किमी) विभाग आणि पश्चिम डीएफसीचा न्यू मकरपुरा ते नवी दिल्ली (401 मार्ग किमी) विभागाची पायाभरणी केली. तसेच, घोलवड विभाग (244 मार्ग किमी) दरम्यान समर्पित फ्रेट कॉरिडॉरचे दोन नवीन विभाग राष्ट्राला समर्पित केले.


यासोबतच, पंतप्रधानांनी अहमदाबाद-मुंबई सेंट्रल, सिकंदराबाद-विशाखापट्टणम, म्हैसूर-डॉ. एमजीआर सेंट्रल (चेन्नई), पाटणा-लखनौ, न्यू जलपाईगुडी-पाटणा, पुरी-विशाखापट्टणम, लखनौ-डेहराडून, कलबुर्गी- सर एम विश्वेश्वरय्या टर्मिनल, रांची- बंगळुरूला-वाराणसी आणि खजुराहो - दिल्ली (निजामुद्दीन) दरम्यान 10 नवीन वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. याशिवाय त्यांनी चार वंदे भारत गाड्यांचा विस्तारही सुरू केला. अहमदाबाद-जामनगर वंदे भारत मार्ग द्वारकापर्यंत, अजमेर-दिल्ली रोहिला वंदे भारत मार्ग चंदीगडपर्यंत, गोरखपूर-लखनौ वंदे भारत मार्ग प्रयागराजपर्यंत आणि तिरुवनंतपुरम-कासारगोड वंदे भारत मार्ग मंगळुरुपर्यंत विस्तारित करण्यात येत आहे.