Sangli Samachar

The Janshakti News

देशात येणार 100 बिलियन डॉलर्सची गुंतवणूक अन् 10 लाख रोजगारसांगली समाचार - दि. १२ मार्च २०२४
नवी दिल्ली - भारताने आज चार युरोपीय देशांच्या 'EFTA' या समुहासोबत एका मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी केली. यामुळे या देशांसोबत वस्तू, सेवा आणि गुंतवणुकीच्या परस्पर व्यापाराला चालना मिळणार आहे. या करारासाठी सात मार्च रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजूरी मिळाली होती. अखेर आज, यावर अधिकृत स्वाक्षरी झाली. EFTA समूहात आईसलँड, लाईकेस्टाईन, नॉर्वे आणि स्वित्झर्लंड या देशांचा समावेश होतो. या चारही देशांशी आता भारत अगदी आरामात व्यापारी गुंतवणूक वाढवू शकणार आहे. याबाबतच्या बैठकीचं नेतृत्त्व भारतातर्फे पीयूष गोयल यांनी केलं.

100 बिलियन डॉलर्सची गुंतवणूक

इंडिया टुडेने दिलेल्या माहितीनुसार, या करारातून पहिल्या दहा वर्षांमध्ये भारतात 50 बिलियन डॉलर्सच्या गुंतवणुकीचं वचन भारताला मिळालेलं आहे. तर त्यापुढील पाच वर्षांमध्ये आणखी 50 बिलियन डॉलर्सच्या गुंतवणुकीचा विश्वास व्यक्त करण्यात येतो आहे.


10 लाख रोजगार

या करारामध्ये 14 भाग आहेत. यामध्ये वस्तू व्यापार, रुल्स ऑफ ओरिजिन, सेवा व्यापार, गुंतवणूक चालना आणि परस्पर सहकार्य, सरकारी खरेदी, बौद्धिक संपदा हक्क, व्यापारातील तांत्रिक अडथळे आणि व्यापार सुलभता अशा गोष्टींचा समावेश होतो. यामुळे भारतात 10 लाख रोजगार निर्माण होणार असल्याचा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे.

ऐतिहासिक करार

"हा FTA अगदी संतुलित, निष्पक्ष आणि न्याय्य आहे. फॉरेन ट्रेड कराराच्या इतिहासात कधीही असा करार झालेला नाही. भारतीय उद्योगांना सर्वोत्तम तंत्रज्ञान मिळवण्यासाठी आणि भारतात नाविन्य आणण्यासाठी FDI म्हणून 100 बिलियन डॉलर्सची प्रचंड गुंतवणूक मिळवण्याची संधी यातून उपलब्ध झाली आहे. यातून थेट 10 लाख नोकऱ्या निर्माण होत आहेत." असं पीयूष गोयल म्हणाले.