Sangli Samachar

The Janshakti News

भारताचा UPI झाला ग्लोबल, आता 10 देशांमध्ये करता येणार 'यूपीआय'द्वारे व्यवहार

 


सांगली समाचार - दि. १३|०२|२०२४

नवी दिल्ली -   भारतीय पेमेंट सिस्टम UPI ला देशांतर्गत तसेच जागतिक स्तरावरही चांगले यश मिळत आहे. नुकतेच मॉरिशस आणि श्रीलंका येथे UPI लाँच करण्यात आले आहे. यानंतर भारताची UPI व्यवहार प्रणाली वापरणाऱ्या देशांची संख्या आता 10 च्या पुढे गेली आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यात फ्रान्समध्ये यूपीआय सुरू करण्यात आला होता. यानंतर पॅरिसमधील आयफेल टॉवरची तिकिटे यूपीआय द्वारे खरेदी करणे शक्य झाले आहे. श्रीलंका आणि मॉरिशसमध्ये UPI सेवेच्या शुभारंभप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, हिंदी महासागर क्षेत्रातील तीन मित्र देशांसाठी आजचा दिवस खास आहे. मला विश्वास आहे की श्रीलंका आणि मॉरिशसला UPI प्रणालीचा फायदा होईल.

ते पुढे म्हणाले की, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांनी भारतात क्रांतिकारी बदल घडवून आणले आहेत. UPI भारतासोबत मित्र देशांना एकत्र आणण्याची नवीन जबाबदारी घेत आहे. परदेशात UPI व्यवहारांचा थेट फायदा भारतीय लोकांना होईल. कोणत्याही त्रासाशिवाय परदेशात सहज व्यवहार करू शकतात. यामुळे विदेशी मुद्रा शुल्क देखील कमी होईल, परिणामी भारतीयांना परदेशात स्वस्त व्यवहार करता येणार आहेत.

UPI ही भारतीय पेमेंट प्रणाली आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन या सरकारी कंपनीने ते विकसित केले आहे. त्याची खास गोष्ट म्हणजे पेमेंट करण्यासाठी OTP ची गरज नाही. तुम्ही फक्त पिन टाकून सहज पेमेंट करू शकता.


कोणत्या देशांत सुरू आहे UPI प्रणाली?

भूतान, मलेशिया, यूएई, सिंगापूर, ओमान, कतार, रशिया, फ्रान्स, श्रीलंका आणि मॉरिशस या देशांमध्ये सध्या यूपीआय पेमेंट प्रणाली सुरू आहे.

इतर कोणत्या देशांमध्ये उपलब्ध होणार UPI?

एका अहवालानुसार, भारत सरकार इतर देशांमध्ये देखील UPI लाँच करण्यासाठी चर्चा करत आहे. यामध्ये ब्रिटन, नेपाळ, थायलंड, सौदी अरेबिया, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, बहरीन, जपान आणि फिलिपाइन्स या देशांचा समावेश आहे.