Sangli Samachar

The Janshakti News

जरांगे यांच्या आक्रमक भूमिकेवर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची चर्चा; जरांगेंच्या मागे किती समाज यावर दिशा ठरणार


सांगली समाचार  - दि. २५|०२|२०२४

मुंबई  - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांविरोधात अत्यंत आक्रमक पवित्रा घेत मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी सागर बंगल्यावर येण्याची घोषणा केली आहे. यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये बैठक झाली. या बैठकीत राज्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी चर्चा झाल्याचे समजते. तसेच मनोज जरांगे पाटील यांची समजूत कशी काढायची? यावरही खल करण्यात आला. जरांगे पाटील यांच्या मागे किती मराठा समाज आहे, यावर सरकारची पुढील दिशा ठरणार असल्याची माहिती मिळाली आहे.

जरांगे पाटील यांच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी

दरम्यान, या बैठकीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे समजते. अशा प्रकारची वक्तव्ये सरकार म्हणून खपवून घेतली जाणार नाहीत, असेही सांगण्यात आले. दरम्यान, चहापानाच्या कार्यक्रमानंतर आज (25 फेब्रुवारी) थोड्याच वेळात पत्रकार परिषद पार पडणार आहे.

जरांगे पाटील राज्य सरकारकडून काढण्यात आलेल्या सगेसोयरे मसुदा अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यासाठी गेल्या 16 दिवसांपासून अंतरवाली सराटीमध्ये उपोषण करत आहेत. आज तेथूनच त्यांनी पत्रकार परिषदेत अत्यंत आक्रमक पवित्रा घेत फडणवीसांवर तोफ डागली. तसेच सागर बंगल्याच्या दिशेने येण्याची घोषणा केली. यानंतर त्यांना ग्रामस्थांकडून कडाडून विरोध झाला. मात्र, ते सागर बंगल्याच्या दिशेने रवाना झाले आहेत.

फडणवीस यांच्यावर षड्यंत्राचा आरोप

मनोज जरांगे यांनी आजच्या बैठकीत फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. मराठा समाजाला ओबीसमधून आरक्षण मिळू नये, यासाठी फडणवीस यांच्याकडून षड्यंत्र सुरु आहे. त्यांच्याकडून मला फसवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. माझा बळी घायचा असेल, तर मी स्वतःच फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जातो. फडणवीस यांना आयुष्यातून उठवून टाकेन, असेही जरांगे म्हणाले. व्यासपीठावरून उठून जरांगे थेट मुंबईच्या दिशेने निघाले. त्यांना थांबवण्यासाठी गावकरी आणि आंदोलकांनी विनंती केली. मात्र, जरांगे आपल्या भूमिकेवर राहिले आणि मुंबईच्या दिशेने निघाले.

मनोज जरांगेंना समजवण्याचा प्रयत्न...

दरम्यान मुंबईकडे निघालेले मनोज जरांगे यांना भोवळ आल्याने काही अंतरावर थांबले. गावकऱ्यांकडून रुमालने हवा देण्याचा प्रयत्न झाला. तुमची प्रकृती ठीक नाही, त्यामुळे तुम्ही पायी चालू नका, अशी वनंती गावकऱ्यांनी केली.