Sangli Samachar

The Janshakti News

शिक्षणाच्या माहेरघराची बनतेय नवी ओळख ?


सांगली समाचार  - दि. २०|०२|२०२४

पुणे - पुणे शहराला एकेकाळी शिक्षणाच माहेरघर समजलं जायचं. सुसंस्कृत आणि पेन्शनरांचे गाव म्हणूनही पुण्याची ओळख होती. परंतु आता गुन्हेगारांचं माहेरघर नि ड्रग्सचे विक्री केंद्र म्हणून पुण्याची नवी ओळख बनते आहे. मागील काही दिवसांपासून पुणे शहरात (Pune News) ड्रग्स विक्रीचे प्रमाण वाढलं आहे. बहुतांश तरुण अंमली पदार्थांच्या सेवनात अडकत आहेत. हीच बाब लक्षात घेता, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अंमली पदार्थ तस्करांवर थेट कारवाई करा, असे आदेशच पुणे पोलिसांना दिले आहेत.

अमितेश कुमार यांच्या आदेशानंतर पुणे पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने शहरात ठिकठिकाणी छापेमारी करण्यास सुरुवात केली आहे. अशातच गुन्हे शाखेने शहरातील विश्रांतवाडी भागात छापा टाकला. यावेळी मोठ्या प्रमाणात मेफेड्रॉन आढळून आले. पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात सोमवारी रात्री (१९ फेब्रुवारी) गुन्हे शाखेच्या पथकाने अचानक छापेमारी केली. या छापेमारीत १०० कोटींपेक्षा अधिक ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे.त्याचबरोबर ५२ किलो मेफेड्रॉनचा साठाही पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. 

छापेमारीत पकडलेल्या मेफेडॉनची किमत तब्बल साडेतीन कोटी रुपये इतकी असण्याची शक्यता आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुणालाही संशय येऊ नये म्हणून मीठ विक्रीच्या आडून हे रॅकेट सुरू होतं. सोमवारी पुणे पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्या तिघांना अटक केली होती. याच प्रकरणाचा अधिकचा तपास करत पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. या संपूर्ण प्रकरणात आंतरराष्ट्रीय रॅकेट असण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, पुणे पोलिसांनी एकाचवेळी १०० कोटींहून अधिक किमतीचे ड्रग्ज जप्त केल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.