Sangli Samachar

The Janshakti News

वाजवा तुतारी, गाढा गद्दारी; बारामतीत व्हायरल केले पत्र "निनावी" !

 


सांगली समाचार  - दि. २९|०२|२०२४

बारामती - वाजवा तुतारी, गाडा गद्दारी, पण बारामतीत पत्र केले व्हायरल "निनावी"... असे घडले आहे. अजित पवारांच्या बंडाविरोधात थेट भूमिका घेऊन नावानिशी पत्र लिहिण्याची हिंमत करण्याऐवजी "बारामतीकरांची भूमिका" या टायटलखाली "निनावी" पत्र व्हायरल झाले आहे. पण या "निनावी" पत्राच्या समर्थनासाठी मात्र शरद पवारांचे पुतणे - रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवार समोर आले आहेत. 

बारामतीत पवार कुटुंबाचे राजकारण मुळात शेतकरी कामगार पक्षाचे होते. आप्पासाहेब पवारांनी शरद पवारांबरोबर त्यांचे राजकारण शेतकरी कामगार पक्षाचा सुरू केले होते. पण शरदरावांचा ओढा काँग्रेसकडे होता. ते काँग्रेस मधून पुढे जात राहिले. त्यामुळे आप्पासाहेबांनी आपले सगळे लक्ष शेतीकडे वळविले, पण पुढची पिढी तयार झाली, तेव्हा राजकारणात कोणाला पाठवायचे आप्पासाहेबांचा मुलगा राजेंद्र की अनंतरावांचा मुलगा अजित याचा विचार सुरू झाला, तेव्हा अनंतरावांच्या मुलासाठी काहीतरी केले पाहिजे म्हणून राजेंद्र पवारांची क्षमता असूनही अजित पवारांना पुढे केले गेले.

शरद पवार आणि राजेंद्र पवार यांनी वेळोवेळी अजित पवारांना सांभाळून घेतले. तेव्हा राजेंद्र पवारांनी बंड केले नाही. पुढचा इतिहास सगळा माहितीच आहे. पण दुसऱ्या पिढीत जेव्हा पार्थ की रोहित अशी निवड करायची ठरली आणि आप्पासाहेबांचा थेट वारसदार म्हणून रोहितला संधी दिली. त्यावेळी खरा जळफळाट सुरू झाला. सुप्रिया सुळे यांची कार्याध्यक्षपदी निवड झाल्यावर धाराशिवच्या काड्या पेटल्या आणि तोफांना बत्त्या लागल्या म्हणूनच बारामतीकरांची ही भूमिका आहे की वाजवा तुतारी गाडा गद्दारी...

एक बारामतीकर

असे सगळे या व्हायरल पत्रात नमूद केले आहे. पण हे पत्र नेमके कोणी लिहिले आहे हे त्यावर नमूद नाही. याचा अर्थ अजित पवारांविरुद्ध बारामतीत वातावरण पेटवायचे पण स्वतःहून पुढे यायची हिंमत दाखवायची नाही, असा शरद पवार गटाचा फंडा सुरू असलेल्या तुम्ही दिसून येत आहे. राजेंद्र पवार मात्र स्वतःहून या पत्राच्या समर्थनासाठी पुढे आले आहेत.