Sangli Samachar

The Janshakti News

कोयना होणार आंतरराष्ट्रीय जलपर्यंटन केंद्र

सांगली समाचार  - दि. २९|०२|२०२४

कोयनानगर  - सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील कोयना मुनावळे येथे शिव सागर जलाशयात जागतिक दर्जाचे जल पर्यटन विकसित करण्यात येणार आहे. या जल पर्यटन सुविधेमुळे या परिसरातील पर्यटनाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ  आणि महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ यांच्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये सामंजस्य करार करण्यात आला. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री शंभूराज देसाई, आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ''प्रकल्पाद्वारे ५ हजारांपेक्षा अधिक स्थानिकांना रोजगार मिळेल. १०० कोटीपेक्षा अधिक पर्यटनातून आर्थिक उलाढाल होईल. हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत.'' महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून या प्रकल्पासाठी ४५ कोटी ३८ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.या प्रकल्पामुळे महाबळेश्वर, पाचगणी, वाईला येणारा पर्यटक कोयना जलाशयाच्या अवतीभोवतीच्या ग्रामीण भागात वळेल. त्यामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था वाढीस लागून स्थानिकांना शाश्वत रोजगार आणि व्यवसायाच्या संधी निर्माण होतील. या प्रकल्पामध्ये जल पर्यटन प्रकार असतील.

भव्य पॅव्हेलियन, कॉन्फरन्स हॉल, जलतरण तलाव, भारतातील पहिले नावीन्यपूर्ण गोड्या पाण्यातील स्कूबा डायव्हिंग, जल सफरमध्ये मोठी क्रूझ बोट असेल. अत्याधुनिक आणि आलिशान हाउस बोट, सौर ऊर्जा/बॅटरीवर चालणारी बोट, अत्याधुनिक प्रवासी बोटी, हवेत उडणारी बोट, अत्यंत वेगवान जेट बोट, पॅरासेलिंग बोट आदी सुविधा असतील. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात पुढील १० दिवसांतप्राथमिक जल पर्यटन सुरु करण्यात येईल. दुसऱ्या टप्यात नवीन बोटी आणि इतर जल पर्यटन आकर्षणे यांचा अंतर्भाव करण्यात येईल. तिसऱ्या आणि अंतिम टप्यात संपूर्ण नवीन भव्य वास्तू, क्रूझ बोट, हाउस बोट यांचा अंतर्भाव करून प्रकल्प पूर्ण केला जाईल.

पायाभूत सुविधा अशा...

प्रकल्पातील पायाभूत सुविधांमध्ये नावीन्यपूर्ण जल पर्यटन केंद्र, पर्यटकांसाठी भव्य आसन व्यवस्था, विविध प्रकारच्या खाद्य प्रकारांचे उपाहारगृह, प्रशासकीय कार्यालय, जलतरण तलाव, स्कूबा प्रशिक्षण तलाव, कॉन्फरस हॉल, व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांसाठी निवासाची सोय, बोटींसाठी आणि पर्यटकांसाठी उतरंडी, तरंगती जेट्टी (मरीना), वाहनतळ, आकर्षक बगीचा असेल.