सांगली समाचार - दि. २१|०२|२०२४
सांगली - कोणी कितीही आग्रह केला तरी मी लोकसभा निवडणूक लढविणार नाही. मात्र, सांगली लोकसभेच्या उमेदवारीसाठी शिफारस करण्याची वेळ आली तर निश्चितपणे विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांचीच करेन, असे मत पालकमंत्री सुरेश खाडे यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
मी विधानसभेत मिरज मतदार संघाचेच प्रतिनिधीत्व करणार आहे. मिरज विधानसभा मतदार संघ जोपर्यंत आरक्षित आहे तोपर्यंत याठिकाणाहूनच मी निवडणूक लढविणार असून त्यानंतर मी पुढील विचार करेन, असेही मंत्री खाडे यांनी सांगितले. सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे असून सांगली मतदार संघातून आपल्या नावाची चर्चा होत असल्याबाबत मत विचारले असता त्यांनी सांगितले, सध्याचे खासदार पाटील चांगल्या पध्दतीने मतदार संघाचे प्रश्न सोडवत असून त्यांना माझा सक्रिय पाठिंबा तर आहेच, पण जर उमेदवारीबाबत मला पक्षाकडून विचारणा झाली तर निश्चितच त्यांच्याच नावाची मी शिफारस करेन. अद्याप मला याबाबत पक्षाकडून कोणतीही विचारणा झाली नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. जिल्ह्यातील अन्य कोणी मोठा नेता भाजप प्रवेशासाठी आपल्या संपर्कात आहे का असे विचारले असता तसे कोणी संपर्कात नाही, मात्र अनेक नेत्यांचे गोपनीय अहवाल आपणाकडे आहेत असेही मंत्री खाडे यावेळी म्हणाले.