Sangli Samachar

The Janshakti News

गोपीचंद पडळकर भाजपावर नाराज?; नव्या संघटनेची केली घोषणा, नाराजीवर थेट बोलले...





सांगली समाचार दि. ०९|०२|२०२४

भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी नव्या संघटनेची स्थापना केली. सांगली जिल्ह्यात त्यांनी संघटनेच्या २५ शाखांचे उद्घाटन केले. त्यामुळे पडळकर भाजपावर नाराज आहेत का अशी चर्चा होऊ लागली. यावर गोपीचंद पडळकरांनी आपण पक्षावर नाराज नाही, माझ्या नेतृत्वाचा माझ्यावर विश्वास आहे असं स्पष्ट सांगितले आहे. 

आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, मी गेल्या १०-१५ वर्ष राजकीय, सामाजिक चळवळीत आहे. महाराष्ट्रभर दौरे करताना अनेक युवकांचे म्हणणं होतं, तुम्ही संघटना काढावी. त्या संघटनेच्या माध्यमातून आम्हाला काम करता येईल. युवकांना जोडता येईल. त्यामुळे युवकांची मागणी लक्षात घेता हिंदुस्थान शिव मल्हार क्रांती सेना ही संघटना मी काढली आहे. त्या संघटनेच्या २५ शाखांचे उद्घाटन आम्ही केलंय. युवकांचा खूप उस्फुर्त प्रतिसाद मिळतोय असं त्यांनी सांगितले. 

तसेच गावगाड्यातील उपेक्षित वंचित, पीडित युवक आहेत. त्या सगळ्या समाजाच्या युवकांना एकत्रित करायचे आणि प्रस्थापितांविरोधात लढा द्यायचा, विस्थापितांना मानाचे सिंहासन मिळवून द्यायचे यासाठी संघटनेची स्थापना केलीय. या माध्यमातून राज्यभरात हजारो शाखा येत्या काही महिन्यात स्थापन होतील. मी जरी भाजपाचा सदस्य असलो तरी आम्ही अराजकीय संघटना स्थापन केली. कुठल्याही पक्षातील, विचारधारेतील युवक आमच्या संघटनेत काम करू शकतो. अराजकीय संघटना स्थापन करायला काहीच हरकत नाही. संघटना काढण्याचा हेतू म्हणजे युवकांना व्यासपीठ मिळत नाही. त्यामुळे या संघटनेच्या माध्यमातून युवकांना व्यासपीठ दिले आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यातून युवक संपर्क साधतायेत, युवकांची बांधणी करून एक मजबूत संघटना तयार होईल. गावातील प्रत्येक प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम संघटनेच्या माध्यमातून केले जाईल असंही गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं. 

मी माझी भूमिका बिनधास्त मांडतो

२०१९ ची निवडणूक भाजपा-शिवसेना महायुतीच्या माध्यमातून लढली गेली. मी बारामतीतून उभा राहिलो. माझा मतदारसंघ खानापूर होता. तरीही आम्ही एकमेकांना मदत केली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे आधीपासून ठरले होते. परंतु निकाल आल्यानंतर शिवसेनेच्या लक्षात आले आपण वेगळं गणित मांडू शकतो. भाजपासोबत विश्वासघात केला. अडीच वर्ष राज्याला विकासापासून वंचित राहावे लागले. राजकारणात शेरास सव्वा शेर राहावे लागते. देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे वगळून एकनाथ शिंदेंसह शिवसेना आणली. अजित पवारांनीही नरेंद्र मोदींशिवाय पर्याय नाही असं म्हटलं आहे. त्यामुळे मी नाराज असल्याचा विषय नाही. मी बिनधास्त माझी भूमिका मांडतो. माझ्या नेतृत्वाचा माझ्यावर विश्वास आहे असं पडळकरांनी म्हटलं आहे. 

बारामतीत भाजपाच निवडून येणार

लोकसभेसाठी मी स्वत: इच्छुक नाही. भाजपाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेतील तेव्हा सांगलीचा खासदार तिसऱ्यांदा भाजपाचा तिथे उभे असतील हा आमचा विश्वास आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे निवडून येणे अशक्य आहे. भाजपानं तिथे कुणालाही उमेदवारी दिली तरी निवडून येईल असं वातावरण होतं, त्यात अजित पवार भाजपासोबत आल्याने बारामतीत विजय होणं शरद पवारांसाठी अवघड आहे असं विधान गोपीचंद पडळकरांनी केले आहे.