Sangli Samachar

The Janshakti News

प्रियांका गांधींचा एक कॉल अन काँग्रेस- सपाची दिलजमाई

 


सांगली समाचार  - दि. २२|०२|२०२४

लखनौ - २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी उत्तरप्रदेशातील काँग्रेस आणि अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षातील  जागावाटपावरून सुरु असलेला वाद अखेर संपुष्टात आला आहे. समाजवादी पार्टीने काँग्रेसला एकूण 17 जागा सोडल्या आहेत. यामध्ये वाराणसी आणि प्रयागराज या २ जागांचा समावेश आहे. समाजवादी आणि काँग्रेसचा जागावाटपाचा तिढा कधी एकदा सुटतो याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष्य लागलं होते. मात्र आता अखिलेश यादव यांनी काँग्रेससोबत आघाडी करणार असल्याचे स्पष्ट केलं आहे. परंतु या सर्व घडामोडींमागे प्रियांका गांधी यांनी महत्वाची भूमिका निभावली आहे. प्रियांका गांधींच्या एका फोन कॉल मुळे काँग्रेस- सपाची दिलजमाई झाली आहे.

समाजवादी पक्ष आणि काँग्रेस युतीची घोषणा होण्याच्या अवघ्या तासापूर्वी प्रियंका गांधी यांनी अखिलेश यादव यांच्याशी फोनवर चर्चा केली, त्यानंतर युती निश्चित झाली. यादरम्यान प्रियंका यांनी अखिलेश यांना बुलंदशहर आणि हाथरसच्या जागांऐवजी दोन चांगल्या जागा द्या, असे सांगितले. प्रियांका गांधी यांनी अवधमध्ये श्रावस्ती लोकसभा जागेचीही मागणी केली. तुम्ही या गोष्टींचा विचार कराल, पण युतीची घोषणा आजच करा असं त्यांनी अखिलेश यादव याना सांगितलं. अखिलेश यांनी सुद्धा प्रियांका गांधींच्या मागणीवर सहानुभूतीपूर्वक विचार केला आणि संध्याकाळपर्यंत उत्तर देऊ असं सांगितलं. त्यानंतरच दोन्ही नेत्यांचे एकमत होऊन युतीवर  शिक्कामोर्तब झाले.

अखिलेश यादव यांची इच्छा होती कि राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि स्वतः ते अशी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीबाबत घोषणा करावी. परंतु आपली तब्बेत ठीक नसल्याचे प्रियांका गांधी यांनी सांगितलं. तसेच आपल्याला आधीच उशीर झाला असून त्यामुळे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत. अशावेळी आता उशीर करायला नको असं प्रियांका गांधी यांनी अखिलेश याना सांगितलं.