Sangli Samachar

The Janshakti News

सांगली, कोल्हापूर, सातारा लोकसभेसाठी काँग्रेसची आज बैठक

सांगली समाचार  - दि. २९|०२|२०२४

सांगली - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा, सांगली आणि कोल्हापूर मतदारसंघाबाबत चर्चा आणि आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेसच्या विधानसभा निरीक्षक, तालुकाध्यक्षांची महत्वाची बैठक आज, गुरुवारी (दि २९) साताऱ्यात होणार आहे.

याबाबत माहिती अशी की, प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री सतेज पाटील आणि विश्वजीत कदम यांच्या सूचनेवरुन विधानसभा मतदारसंघ प्रभारींची नियुक्ती करण्यात आलेली आहे.  सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील निरीक्षक आणि तालुकाध्यक्षांची महत्वपूर्ण बैठक दि. २९ फेब्रुवारीला सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीत होणार आहे. या बैठकीत लोकसभा मतदारसंघाचा आढावा काँग्रेसच्या सचिव सोनलबेन पटेल या घेणार आहेत. यावेळी काँग्रेसचे सातारा जिल्हा प्रभारी श्रीरंग चव्हाण-पाटील, सातारा जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, ज्येष्ठ नेते ॲड. विजयराव कणसे, अजितराव पाटील-चिखलीकर, रणजितसिंह देशमुख, राजेंद्र शेलार, काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा अल्पना यादव आदी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, गुरुवारी सकाळी ११ ला सातारा जिल्ह्याची बैठक होणार आहे. तर दुपारी एक ते तीन वाजेपर्यंत सांगली जिल्हा आणि त्यानंतर साडे तीन ते पाच वाजेपर्यंत कोल्हापूर जिल्ह्याची आढावा बैठक होणार आहे.