Sangli Samachar

The Janshakti News

महाराष्ट्रातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत; विजेत्याला मिळणार फ्लॅट

 सांगली समाचार -  दि. १५|०२|२०२४

सांगली : सांगली जिल्ह्यात महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने कासेगावमध्ये बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आलं आहे. आता पर्यंत बैलगाडी विजेत्याला थार गाडी आणि लाखोंचे बक्षीस देण्यात आली आहेत. मात्र कासेगावमध्ये आयोजित जयंत केसरी बैलगाडी स्पर्धेतील विजेत्यास चक्क वन बीएचके फ्लॅट बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. सध्या या स्पर्धेची जोरदार चर्चा सांगलीसह महाराष्ट्रभर होत आहे.

इतिहासातील सर्वात मोठे बक्षीस

कासेगाव येथील शरद लाहीगडे फाउंडेशनकडून १७ फेब्रुवारी रोजी या बैलगाडी शर्यतींचे आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेतील दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला ७ आणि ५ लाख रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. राज्यातील बैलगाडा शर्यतीतीच्या इतिहासातील हे सर्वात मोठे बक्षीस आहे. या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यासह कर्नाटक, मध्यप्रदेश राज्यातून २०० हुन अधिक बैलगाडी स्पर्धक सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी १० एकरांवर मैदान तयार करण्यात आले आहे.