Sangli Samachar

The Janshakti News

वकील आणि न्यायाधीशांनी न्याय शोधला पाहिजे : न्यायमूर्ती कोतवाल




सांगली समाचार  | ०५|०२|२०२४

विटा येथे जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयाचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधिश प्रदीप शर्मा, विट्याच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधिश डी. वाय. गौड, विटा बार कौन्सिलचे अध्यक्ष अॅड. सचिन जाधव उपस्थित होते. यावेळी बोलताना आपण न्यायालयात न्याय देत नाही, तर न्याय शोधून देतो. त्यामुळे वकील आणि न्यायाधीशांनी न्याय शोधला पाहिजे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांनी व्यक्त केले.

यावेळी न्यायमुर्ती सारंग कोतवाल म्हणाले, बऱ्याच वर्षाची मेहनत घेतल्यानंतर विट्यात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय सुरू होत आहे. हा केवळ कार्यक्रम नाही, तर चांगल्या दिवसांचा प्रारंभ आहे. २९ वर्षांच्या पाठपुराव्यानंतर आजचा दिवस आला आहे. दिरंगाई झाली तर यातून लोकांचे प्रश्न पुढे येत असतात. विट्यात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय होत असताना इतर तालुक्यातील बार कौन्सिलनी पाठबळ दिले, हे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर सांगली बार कौन्सिलचेही तुम्ही विशेष आभार मानले पाहिजेत. येथे जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय झाल्यामुळे सर्वात जास्त चांगले काम काय होणार तर वेळेची बचत होणार आहे. एखाद्या फौजदारी प्रकरणात न्यायालयीन कोठडी मिळाली किंवा दिवाणी प्रकरणात ताबा घेण्याच्या विषयात वेळेला फार महत्त्व असते. अशावेळी विट्यात न्यायालय झाल्यामुळे वेळेमुळे होणारे नुकसान टळणार आहे. त्याचा फायदा पक्षकारांना होणार आहे. शेवटी आपण सर्वजण पक्षकारांसाठी काम करीत असतो. वास्तविक पाहता दोन बाजूचे दोन पक्षकार न्यायालयात येतात, तेव्हा खरं आणि खोटं काय आहे, हे त्या दोन्ही पक्षकारांना माहित असते. अशावेळी दोन्ही पक्षकारांचे वकील आणि न्यायाधीश यांनी एक टीम म्हणून सत्य शोधण्यासाठी काम केले पाहिजे असेही न्यायमूर्ती कोतवाल यांनी सांगितले.

यावेळी बोलताना न्यायमूर्ती शर्मा म्हणाले की, विट्यातील न्यायालयामुळे चार तालुक्यातील पक्षकारांची सोय होणार आहे. पक्षकारांना अर्थिक भुर्दंड बसू नये आणि वेळेची बचत व्हावी, यासाठी हे न्यायालय उपयुक्त ठरणार आहे. पक्षकार आणि वकील अशा दोघांचाही वेळ आणि पैसा वाचणार आहे. शिवाय न्यायालयातील प्रकरणांचा जलद निपटारा होईल. या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात २ हजार ५२४ प्रकरणे वर्ग करण्यात आल्याचेही शर्मा यांनी सांगितले.

आपले मनोगत व्यक्त करताना , ॲड. सचिन जाधव म्हणाले, विटा बार कौन्सिलची निवडणूक झाल्यानंतर दोन दिवसांनीच आम्ही मुंबईला गेलो, तेव्हा माझी ओळख माझ्या विरोधात लढलेले ॲड, उदय यादव यांनी व्यासपीठावर आता असलेल्या लोकांशी करून दिली. इतके चांगले वातावरण विटा बार कौन्सिलमध्ये आहे. आम्हाला पलूस, कडेगांव आणि आटपाडी बार कौन्सिलनी चांगले पाठबळ दिले. जिल्ह्यातील सर्व न्यायमुर्तीनी चांगले मार्गदर्शन केले, त्यामुळे आजचा दिवस उजाडला आहे, असेही ॲड. जाधव म्हणाले. स्वर्गीय आमदार अनिल बाबर, माजी आमदार सदाशिव पाटील यांच्यासह चार तालुक्यातील लोकप्रतिनिधींचे योगदोन असल्याचे सांगत पुढेही बार कौन्सिलचे वातावरण सौहार्दपूर्ण राहिल, असा विश्वास ॲड.जाधव यांनी व्यक्त केला.